Homeमुक्त- व्यासपीठगावची निवडणूक व राजकारण | POlitics

गावची निवडणूक व राजकारण | POlitics

       निवडणूक म्हटले कि राजकारण, झंझट, पैसा, घोडेबाजार, पोकळ आश्वासने या व अशा अनेक घृणास्पद गोष्टींनी निवडणुकांना ओळखल्या जाते. पण हीच राजकारणाची ओळख असेल तर गावाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टिंचे काय होईल? काय झाले आहे? हे आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. फक्त निष्पक्ष दृष्टिकोनातून बघावे. निवडणुकांच्या किंवा राजकारणाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास करता येतो किंबहुना राजकारण म्हणजे विकासाचे माध्यम. पण सद्यस्थितीत राजकारणाची दशा आणि दिशा कशी चालली आहे हे सर्वश्रुत आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आपल्याकडील कॉम्रेड सुदामकाका देशमुख यांच्या राजकारणाची दिशा आणि विचारसरणी मुळे देशाला स्वातंत्र्याबरोबरच नवविकासाची वाट मिळाली होती. पण आता या महापुरुषांचा केवळ बॅनर वर फोटो टाकण्यापुरता च वापर केला जातो. विचारांच्या वारसाशी काही देणे घेणे नाही.
        केरळ मध्ये ग्रामपंचायत पासून ते संपूर्ण राज्य विकासाचं मॉडेल आहे. आपल्या राज्यातही अनेक पारदर्शक ग्रामपंचायत कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श आपल्या समोर आहे, जर ते करू शकतात तर आपण का नाही? जर आपण आतापर्यंत निवडून दिलेले प्रतिनिधी तसं गावाचं मॉडेल तयार करू शकत नसेल तर त्यांना नालायक ठरवून हद्दपार करा. आपण आपल्या गावाच्या विकासासंबंधी असंतुष्ट असू तर गावाच्या ग्रामपंचायत मध्ये बदल घडविणे आपले परम कर्तव्य आहे.
          जेव्हा पासून ग्रामपंचायत बनली तेव्हापासून उभे राहणारे तेच चेहरे किंवा त्याच त्या घरातील व्यक्ति ला संधी दिली जाते आणि गावाचा विकास काहिच नाही. या घराणेशाहिला तडा देण्यासाठी आपण आता खंबीर व्हायला पाहिजे. सामान्य माणसाला केवळ आश्वासनांच्या पुरामध्ये भिजवल्या जात आहे किंवा मत विकत घेऊन पाच वर्षांसाठी गुलाम बनविल्या जाते. मागच्या खेपेला जी आश्वासने दिली होती तीच आश्वासने पुन्हा दिल्या जाते. पण आपण पाच वर्षांसाठी निवडून दिले होते ना? मग का नाही पूर्ण केली ती आश्वासने ? जेव्हा आम्ही ही आश्वासन पूर्ण केली म्हणून आम्हाला मत द्या असे म्हटले जाईल व ती खरी असेल तेव्हाच योग्य ग्रामपंचायत पॅनल समजावे.

पण वेळ बदलली आहे, आता अशा विचारसरणीच्या प्रस्थापित राजकारण्यांसमोर सक्षम पर्याय उपलब्ध असेल आणि यांच्यापेक्षा चांगले काम करण्याची कुवत असेल अशाच समाजकारणी राजकारण करणाऱ्यांना संधी देऊन गावाला वाचवा, ही आर्त विनंती. गावातील उमेदवार शिकलेला असो किंवा नसो ही दुय्यम गोष्ट आहे पण तो किती इमानदार आहे, गावासाठी, गावातील लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे अशा उमेदवाराला व यांच्या पाठीशी उभ्या अशाच विचारसरणीच्या सर्व पॅनलला निवडून देण्यात काय हरकत आहे. म्हणून गावामधील ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणे म्हणजे, माझ्या मते गावाच्या विकासामध्ये हातभार लावण्याच्या संघर्षामध्ये सामिल होण्यासाठी प्रयत्न करणे. पण उभा राहणारा घराणेशाहितील उमेदवार स्वकमाई करण्यासाठी, स्वतः चे घर मजबूत करण्यासाठी, स्वतः चा तोरा मिरवण्यासाठी असतो. यांच्यामागे टाळूवरचे लोणी खाणारे असतातच. जर अशा विचारसरणीच्या राजकारण्यांनी आरक्षित जागेमुळे एखाद्या गरिबाला जिल्हा परिषद सारख्या महत्त्वाच्या स्थानिक निवडणुकीत उभे करून निवडून आणले तरिसुद्धा ते त्या व्यक्तिचा स्वहितासाठी वापरच करून घेतात व गप्प राहायला सांगतात अशी उदाहरणे आपल्या समोर आहेत.
म्हणून सर्व नागरिकांनी आता जागृत व्हा व इमानेइतबारे काम करत असणाऱ्या किंवा करू शकणाऱ्या व्यक्तिला च निवडून द्या. यासाठी सर्वांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धी चा वापर करा. म्हणून सर्वप्रथम मत देणे म्हणजे आपण कुणावर तरि उपकार करत आहोत ही विचारसरणी सोडा. मतदान हा आपल्याला लोकशाहिने दिलेला सर्वात मोठा हक्क आहे. तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. मत दिले म्हणजे आपले काम संपले नसते तर जागरूक नागरिक बनून योग्य उमेदवारांना त्यांच्या विचारांची पार्श्वभूमी बघून किंवा त्यांना साथ देणाऱ्यांच्या विचारांची पार्श्वभूमी बघूनच मत द्या.
माझ्या मते, निवडून येण्यासाठी जेवढा खटाटोप केल्या जातो तो संघर्ष माझ्या मते नगण्य आहे. कारण खरा संघर्ष सुरू होत असतो निवडून आल्यानंतर. पण निवडून आल्यावर आपले काम संपले व आलेल्या योजनांमध्ये, कामांमध्ये आपली हिस्सेदारी किती यापुरतेच काम केल्या जाते. पण निवडून आल्या नंतर संघर्ष केल्यास गावाचा विकास निश्चित आहे.
गावाचा विकास नाऱ्या पुरता किंवा प्राचारा पुरताच न ठेवता खरोखरच करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा.

मी माझा लेख अल्पशा अनुभवातून व विचारशक्तितून लिहू शकलो. काही चुकल्यास टिप्पणी द्वारे कळवा.. संपूर्ण लेख वाचल्याबद्दल धन्यवाद..

लेखक-: मनोज प्रल्हादराव गावनेर ( अमरावती )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular