२३ वर्षीय जवानाने कर्तव्य बजावतानाच आयुष्य संपवलं,
Sangli Jawan Suicide : सांगलीच्या यमगरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मयूर डोंबाळे दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सांगली : तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील जवानाने ऑन ड्युटी आत्महत्या केली. मयूर लक्ष्मण डोंबाळे असं २३ वर्षीय जवानाचं नाव आहे. जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात कर्तव्यावर असताना त्याने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आपले जीवन संपवले.
या घटनेने सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात यमगरवाडीसह तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
यमगरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मयूर डोंबाळे दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. त्याची नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात होती. तेथील महेश्वर सैन्य शिबिरात त्याने कर्तव्यावर असताना शुक्रवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले.
त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी कुटुंबीयांना ही बातमी समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.