Homeघडामोडीमहाराष्ट्रातील सर्व शाळामधील पहिलीपासून हिंदी सक्तीचे धोरण मागे घ्या - आजरा तालुका...

महाराष्ट्रातील सर्व शाळामधील पहिलीपासून हिंदी सक्तीचे धोरण मागे घ्या – आजरा तालुका पुरोगामी व प्रागतिक पक्ष संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन

आजरा (हसन तकीलदार ) :-महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करून मराठी शाळा बंद करण्याच्या दिशेने घेतल्या जात असलेल्या राज्यसरकारच्या धोरणाला विरोध असून पहिलीपासून हिंदीची सक्ती धोरण मागे घेण्यासाठी आजरा तालुका पुरोगामी व प्रागतिक पक्ष संघटनेने तहसीलदार यांना निवेदन देत हिंदी सक्ती करू नये असे म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि,महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांच्यामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचे धोरण घेतले आहे. या धोरणामुळे महाराष्ट्रातील मुलांच्या बौद्धिक विकासात मोठी गुंतागुंत तयार होणार आहे. खरतर लहान वयात कोणत्याही संकल्पना नीटपणे समजायच्या असतील तर मातृभाषा आणि स्थानिक बोलीभाषेतूनच त्या अधिक प्रभावी पध्दतीने मुलांच्यापर्यंत पोहचतात. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. महाराष्ट्रात प्रमाणमराठीपेक्षा बोली भाषेत जास्त संवाद होतांना दिसतो. बोली हीच संवादाची प्रभावी भाषा असते. महाराष्ट्रात मालवणी, अहिराणी, गोंडी, भिलोरी, पावरी, मराठवाडी, खानदेशी, चंदगडी अशा अनेक बोली भाषा आहेत. या साऱ्या बोली भाषांनी मिळून प्रमाणमराठी भाषा समृध्द केली आहे.

वेगवेगळ्या बोली भाषेतून आलेल्या मुलांना प्रमाणमराठी सुध्दा समजताना अडचणीचे जाते. असे असतांना देखील हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याची सक्ती का? असा आमचा सवाल आहे. खरतरं यामागे भाषेचे राजकारण आहे हे स्पष्ट आहे. एखाद्या जनसमुदायावर सत्ता गाजवायची असेल तर प्रथम त्या जनसमूहाला त्याच्या भाषेपासून तोडावे लागते. एखदा हा जनसमूह आपल्या भाषेपासून तुटला की तो सांस्कृतिक दृष्ट्या गुलाम होतो. कारण भाषा हे संस्कृतीचे वहन करणारे प्रभावी माध्यम आहे. सांस्कृतिकदृष्ट्या गुलाम झालेल्या समूहावर सत्ता करणे सहजसोपे असते. थोडक्यात भाषेच्या माध्यमातून वर्चस्वाचे राजकारण खेळले जाते. त्यामुळे हिंदी भाषा सक्तीच्यामागे एक भाषिक राजकारण आहे हे स्पष्ट आहे. म्हणूनच आमचा या धोरणाला तीव्र विरोध आहे.

नवी भाषा सक्तीने मुलांच्या माथी मारली तर मुलं बिथरतात. त्यांचा आत्मविश्वास ढासळतो. कारण मुलं जेंव्हा शाळेत येतात तेंव्हा ज्या समाजातून येतात तेथील दंतकथा, मिथक यांनी बनवलेली एक भक्कम चौकट घेऊन ती शाळेत येतात. शाळा मुलांना भाषा कशी लिहावी, कशी वाचावी या क्षमता विकसित करतात. वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत अवतीभवतीच्या भाषेतून १५ ते १८ हजार शब्दांची त्यांना ओळख झालेली असते. या साऱ्याचा विचार पहिली पासून हिंदी सक्तीचे धोरण घेतांना केले आहे असे दिसत नाही.

जगभरात सात हजार भाषा बोलल्या जातात. त्यामध्ये सर्वात जास्त बोलणाऱ्या वीस भाषात मराठी सोळा ते सतराव्या क्रमांकावर आहे. (तिच्या सर्व बोलीसह) ज्यांचा इतिहास किमान पंधराशे वर्षाचा आहे अशा सात भाषा जगात आहेत त्यात मराठी आहे. असे असतांना हिंदी पहिली पासून शिकविण्याची सक्ती का? त्यमुळे हे धोरण तातडीने मागे घ्यावे अन्यथा आम्हाला आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब करावे लागेल असेही या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर कॉ. संपत देसाई,कॉ. शांताराम पाटील, रवींद्र भाटले,प्रकाश मोरुस्कर,दशरथ घुरे, संजय घाटगे,बाळू जाधव, भीमराव माधव ,काशिनाथ मोरे, नारायण भडांगे, महादेव होडगे, हिंदुराव कांबळे, निवृत्ती मिसाळ, दौलत राणे आदींच्या सह्या आहेत.

🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचे व्यासपीठ – Link Marathi 🌿

तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.

🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular