भाग -३
दगडूशेठ गणपतीला वळसा घालून खाली जात राहिलं की वाटेत शनिवारवाडा लागतो.
पेशव्यांच्या राजधानीचं हे नावजलेलं ठिकाण.
त्याच्या उमेदीच्या काळात बाहेरून किती दिमाखदार दिसत असेल ना हा शनिवारवाडा.
एखाद्या लावण्यवतीची दृष्ट काढावी इतका भव्य असेल तो.
पण सुंदरतेला अपूर्णतेचा शाप असतो म्हणतात.
शनिवारवाडा ही तसाच श्रापीत झाला.
आहो घरातला अंतर्गत कलह वाढत राहिला ना की घर हे घर राहत नाही.
ते स्मशान होतं.
शनिवारवाड्यानेही अंतर्गत कलह फार सोसले.
श्रीमंत……
या घरात मुस्लिम मुलगी सून म्हणून चालणार नाही. बाकी ती रखेल म्हणून राहिली तरी चालेल.
पण पेशवेपणाला विरुद्ध जातीचा स्पर्श नको.
आऊसाहेब बाजीरावांना मस्तानीबद्दल असं सांगायच्या तेंव्हा बाजीरावाला किती वाईट वाटलं असेल?
पुरुष कितीही शूर असला तरी नात्यांच्या बेड्या त्याचा श्वास बंद करायला पुरेश्या असतात.
याच शनिवारवाड्याने बाजीराव मस्तानीचं अमर प्रेम बघितलं.
आऊसाहेबांचा तिरस्कार बघितला.
पेशव्यांचा अंतर्गत कलह बघितला.
आणि एके दिवशी हा भार सोसेना म्हणून स्वतःला जाळून घेतलं या शनिवार वाड्यानं.
आता फक्त भग्न अवशेष उरलेत या वाड्याचे.
दूर दूरवरून लोकं हा वाडा बघायला येतात.
म्युनिसिपालटीने हल्ली हा वाडा बघायला तिकीट लावलंय.
माणसं भग्नावशेष बघायचे सुद्धा पैसे लावतात यार.
हे असं करणं म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं झालं.
मी माझी शबनम सावरत तिकीट रांगेत उभा राहिलो.
वाडा मलाही बघायचा होता.
विशेष करून मस्तानी जिथे राहत होती ते ठिकाण.
कारण प्रेमाशिवाय दुसरी कुठलीच पवित्र गोष्ट या जगात अस्तित्वात नाही.
आणि बाजीराव-मस्तानीचं प्रेम तर अमर होतं.
मी तिकीट काढून पुढे जायच्या अगोदर त्या विशाल दरवाज्याच्या पायरीवर डोकं टेकलं.
यासाठीच की इथल्या वास्तूत दोन प्रेमी जीव राहत होते.
त्यांचं प्रेम मात्र कुणालाच पचल नाही.
मी त्या दारातून आत गेलो.
सगळे भग्न अवशेष.
अगदी माझ्यासारखे.
मी गार्डला तिथलं मस्तानी रहात असलेलं ठिकाण विचारलं.
त्याने दाखवलं.
गर्दी फार कमी होती.
त्या छोटेखानी अंधाऱ्या वाटेतून जातांना मी त्या प्रत्येक दगडाला स्पर्श करत होतो.
याचसाठी की कधी ना कधी बाजीराव किंवा मस्तानीचे पवित्र हात या दगडाला लागून हे दगड पवित्र झाले असतील.
जसे की श्री रामाच्या स्पर्शाने दगडातली पावन झालेली अहिल्या.
त्या प्रत्येक दगडाला स्पर्श करतांना का कुणास ठाऊक… माझे डोळे भरून येत होते.
आहो शेवटी लेखक माणसं आम्ही.
आयुष्यातले छक्के पंजे करायला आम्हाला खरंच जमलं नाही.
की कधी कुणावर अन्याय करायला ही मन धजावलं नाही.
आपण भलं.आपली वाट भली.
पण या वाटेवर कोणी जाणून बुजून काटे पेरले तर…?
लेखक मनाने फार हळवा असतो.
त्याच्या मनाशी खेळणं म्हणजे त्याच्यातल्या निरागस बाळाला जाणून बुजून दुःख देण्यासारखं असतं.
जो त्याच्यातल्या निरागस बाळाला त्रास देतो ना…
देव त्याचं कधीच भलं करत नाही.
पायऱ्या संपल्या.
शेवटच्या पायरीवर मी बसून राहिलो कितीतरी वेळ.
माझे डोळे भरत होते.
रिते होत होते.
आता कधीच आपण कोल्हापूरला जायचं नाही.
काय उरलंय आता तिथं.?
एक मोडकळीस आलेलं घर…?
आणि आई बाबांच्या असंख्य आठवणी…….
माणसाला आठवणींचा भलताच त्रास असतो.
पण त्या विसरता ही येत नाहीत हेच मोठं दुःख आहे आपलं.
नकळत दोन थेंब गालावरून ओघळले.
एका थेंबात आईचं दुःख होतं.
तर दुसऱ्या थेंबात बाबाची तडफड.
आपण काहीच करू शकलो नाही यांच्यासाठी.
आयुष्यभर जगासाठी लिहीत राहिलो.
फकीर होऊन जगत राहिलो.
आपण फार मतलबी माणसं आहोत.
कारण आपल्याला आपल्याच विश्वात रमून जाणं आवडत असतं.
याचसाठी लेखकाला वेडा म्हणतात लोकं.
पण हीच वेडी माणसं जेंव्हा लिहितात ना…
तेंव्हा शहाणे त्याची पारायणं करत राहतात.
माझ्या अश्रूंचा वेग वाढत होता.
सगळा शनिवारवाडा आता धूसर दिसायला लागला.
आणि माझं मन भूतकाळात शिरलं.
क्रमशः ……
- दत्तात्रय श्रीकांत गुरव.
रा- चक्रेश्वरवाडी.
ता- राधानगरी.
जि-कोल्हापूर.

मुख्यसंपादक