गुलमोहर

ज्याच्या नावातच गुलाबी मोहोर दडलेला आहे, जो वसंताच्या आगमनाची चाहूल आहे, चैतन्याचे प्रतीक म्हणून मिरवतो, जो सृष्टी बरोबर मनाचाही मोहोर गुलाबी करतो. आपल्या शाखांचे बाहू विस्तारत, जणू आकाशा बरोबर मनालाही गवसणी घालतो.

तप्त सूर्यकिरणांनी धरणी होरपळून निघत असताना, हा मात्र अगदी शांत, निश्चल असा उभा असतो. आपल्या बाहू च्या शाखाविस्तारत, तो सूर्यकिरणांचा दाह आपल्या अंगावर झेलत. जणू त्यांना सांगत असतो, ‘तू कितीही आग ओक , मी माझं मोहरणं सोडणार नाही’. जणू त्या प्रखर सूर्यकिरणांशी स्पर्धा करत असतो. आणि चैतन्याची जबाबदारी सांभाळत असतो. त्याचा तो लाल लाल पिसारा, निळ्या निळ्या आकाशाशी जणू रंगसंगती साधत असतो. त्याचा तो पडलेला नाजूक फुलांचा लाल लाल सडा पाहून असे वाटते की, आपल्या कोमल हातांची दुलई जणु तो धरणीला पांघरतो आणि स्वतः बरोबर तिचेही सौंदर्य वाढवतो.
अधून मधून दिसणारी त्याची हिरवी कोवळी पाने, जणू स्वत:च अस्तित्व जपणारी. फुलांच्या आडून डोकावणारी. आपल्या नाजूक कोवळ्या फुलांनी, मनाचेही कोवळेपण जपणारा ,चित्त प्रसन्न करणारा. मनाचा तोल सावरणारा. कायम आपलं वेगळेपण जपणारा.

कधी कधी हा मला बोहल्यावर चढणाऱ्या या तरूणीचा अंतरंग वाटतो. संसारसुखाची स्वप्ने रंगवत, तिच्या भावविश्वात रममाण होत, तिचं अंतरंग मोहरून टाकणारा. जिथं पानांच्या अस्तित्वाला ही जागा न ठेवणारा. प्रेमाच्या लाल रंगात न्हाऊन निघणारा, प्रियकर प्रेयसीच्या मनातील भावनांना पूर्णत्व देणारा.मनातला गुलमोहर प्रत्यक्षात अवतरणारा. नवीन नवीन स्वप्नांच्या शाखा विस्तारणारा. संसारातील दाह ,चटके स्वीकारून स्पर्धेत यशस्वी होणारा.

लेखिका- सौ उल्का कुलकर्णी

http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/
तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहेत ..
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular