दुध देणाऱ्या आणि गाभण जनावरांची नीट काळजी घेतली नाही किंव्हा त्यांचा आहारात त्रुटी राहिल्यास थंड वातावरणामुळे जनावरांना विविध आजारांचा धोका संभवतो. यामध्ये संसर्गजन्य आणि दूध उत्पादकतेशी निगडित आजारांचा समावेश होतो. आज आपण संसर्गजन्य रोगांबद्दल जाणून घेऊ:
_*फुफ्फुसदाह (न्यूमोनिया)*_
दुग्धउत्पादनाचा ताण, वातावरणातील बदल तसेच दुधाळ जनावरांना जास्त वेळ थंड वातावरणात ठेवल्यास फुफ्फ्सदाह आजार होण्याची शक्यता असते.
हा आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य असून विविध जिवाणू श्वसन संस्थेत शिरकाव करून आजार निर्माण करू शकतात.
या आजारात नाकातून सुरुवातीला पातळ पाणी/ शेंबूड येतो पुढे जाऊन तो घट्ट पिवळसर किंवा हिरव्या रंगाचा होतो. जनावराचे खाणे –पिणे मंदावते, रवंथ करणे बंद होते.
श्वसनाचा वेग वाढतो, जनावर बैचेन होते व दुग्धउत्पादन घटते. काही जनावरांत खोकणे / ढासणे आढळून येते.
*निदान*
थंड वातावरण, लक्षणे व प्रयोगशाळा तपासण्या करून फुफ्फुसदाह आजाराचे निदान करता येते.
*उपचार*
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविक औषधे व तत्सम उपचार करून घेतल्यास जनावरातील फुफ्फुसदाह आजार बरा होतो.
*प्रतिबंध*
१. हिवाळ्यात दुधाळ जनावरांचे थंड वातावरणापासून सरंक्षण करावे.
२. गोठ्यातील वातावरण ऊबदार ठेवावे.
३. गोठ्यात स्वच्छ हवा खेळती रहावी याचे नियोजन करावे.
*लाळ्या-खुरकूत (एफ.एम.डी.)*
हा विषाणूजन्य आजार दुधाळ जनावरांसाठी अत्यंत धोकादायक असून याचा प्रसार थंड वातावरणामध्ये जास्त प्रमाणात होतो.
प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या तोंडात जिभेवर, हिरड्या तसेच खुरांमध्ये फोड येतात व ते फुटल्यानंतर तिथे जखमा व व्रण निर्माण होतात.
आजारी जनावरांना भरपूर ताप (१०४-१०६ अंश फॅरनहाइट) येतो, तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळते, चारा खाणे व रवंथ करणे बंद होते, श्वसनाचा वेग वाढतो, दुग्धउत्पादन घटते.
या आजाराचा सहा महिन्यांखालील वासरांना संसर्ग झाल्यास मरतूक आढळून येते. आजारातील जखमा भरून आल्यानंतर जनावरांमध्ये विविध व्यंग आढळून येतात जसे की डायबेटीस, धाप लागणे, शरीरावर केस जास्त प्रमाणात वाढणे, प्रजननक्षमता कमी होणे, कासदाह आजाराचा संसर्ग वाढणे इत्यादी व त्यातून पशुपालकाला मोठे आर्थिक नुकसान होते.
*उपचार व प्रतिबंध*
विषाणूजन्य आजार असल्याने त्यास उपचार नाही.
तोंडातील व खुरांवरील जखमांचे २ टक्के पोटॅशियम परमॅंग्नेटच्या द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे, तोंडात बोरोग्लीसरीन लावावे व पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे.
लाळ्या-खुरकत आजाराची व्याप्ती व त्यापासून होणारे आर्थिक नुकसान पाहता ३ महिन्यांवरील सर्व वासरांचे व जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण वर्षातून दोन वेळा (फेब्रुवारी-मार्च व सप्टेंबर-नोव्हेंबर) करून घेणे आवश्यक आहे.
मुख्यसंपादक