Homeकृषीहिवाळ्यात थंडी मुळे होणाऱ्या आजारापासून वाचवण्यासाठी कोंबड्यांच्या शेड चे नियोजन

हिवाळ्यात थंडी मुळे होणाऱ्या आजारापासून वाचवण्यासाठी कोंबड्यांच्या शेड चे नियोजन

कोंबड्यांच्या आरोग्यासाठी हिवाळा ऋतू हितकारक मानला जातो. मात्र, उन्हाळ्यात जशी उष्माघातामुळे मरतुक येते, तसेच तापमान कमी झाल्यास कोल्डस्ट्रोक येऊ शकतो.

या व्यतिरिक्त थंड हवेमुळे क्रोनिन रेस्पायरेटरी डिसिज, इन्फेक्‍सींयस कोरायझा सारख्या जीवाणूजन्य आणि इन्फेसिंअस ब्रॉकायटीस, कमी तीव्रतेचा बर्डफ्लू सारख्या विषाणूजन्य आजाराचा कोंबड्यांमध्ये प्रादुर्भाव होतो. हिवाळ्यात लिटरमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ती जागा ओलसर राहते. यामुळे कोंबड्यांना रक्ती हगवण, बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊन, त्यांच्यामध्ये मरतुक येण्याची शक्यता असते.

*शेडमधील तापमान*

१. शेडमधील ब्रॉयलर कोंबड्यांना वयाच्या पहिल्या आठवड्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.
२. दुसऱ्या आठवड्यात ३२ ते ३३ अंश सेल्सिअस तापमान लागते. नंतरच्या प्रत्येक आठवड्यात २ ते ३ अंश सेल्सिअसने तापमान कमी करत जावे.
३. थंड हवामानात पिल्लांचे शेड उबदार राहणे गरजेचे असते, त्यासाठी ३ आठवड्यांपर्यंत ब्रुडिंग केले जाते. तापमान वाढविण्यासाठी विजेचे बल्ब, शेगडी इत्यादींचा वापर करावा.
४. कोंबड्यांना योग्य वयात योग्य तापमान न मिळाल्यास, ताण येऊन त्या आजारास बळी पडतात.
५. शेडमधील तापमान खूपच कमी झाल्यास, पिल्लांमध्ये कोल्ड स्ट्रोकमुळे मरतुक येते.

*खाद्य व्यवस्थापन*

१. हिवाळ्यात कमी तापमानामुळे कोंबड्या जास्त खाद्य खातात, त्यामुळे त्यांच्या खाद्यात योग्य बदल करावेत.
२. आहारात ऊर्जावर्धक घटकांचे प्रमाण वाढवावे (१०० किलो कॅलरीज प्रति किलो खाद्य) आणि प्रथिनांचे प्रमाण १ ते २ टक्के कमी करणे आवश्‍यक असते.
३. खाद्यामध्ये अ, क आणि ई या जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढवावे.

*पाणी व्यवस्थापन*

१. पाण्याचे निर्जंतुकीकरण केल्यास हिवाळ्यामध्ये पाण्यातून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
२. यासाठी ब्लिचिंग पावडरचा (१ ग्रॅम पावडर ५०० लिटर पाणी) वापर करता येतो. तसेच शिफारशीत औषधांचा वापरही करता येतो.

*लिटरचे व्यवस्थापन*

१. हिवाळ्यात लिटरचा ओलसर भाग काढून टाकावा, तसेच गादीमध्ये प्रति १०० चौ. फुटांसाठी २ ते ३ किलो चुना मिसळावा.
२. ओलावा कमी करण्यासाठी लिटरचे थर वेळोवेळी खाली वर करावेत.
३. चांगली ऊब येण्यासाठी लिटरचा थर सहा इंचापर्यंत जाड ठेवावा.

*प्रकाश नियोजन*

१. अंडी देणाऱ्या कोंबडीसाठी १६ तास आणि मांस उत्पादनातील कोंबड्यांसाठी २३ तास प्रकाश देण्यात यावा.

*वायुविजन*

१. शेडमध्ये हवा खेळती राहणे गरजेचे असते. कारण कोंबडी नैसर्गिकरीत्या श्‍वास आणि विष्ठेद्वारे भरपूर ओलावा तयार करते.
२. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेडच्या दोन्ही खुल्या बाजूच्या भिंतीवर गोणपाटाचे पडदे लावावे. परंतु, ऊब देण्याच्या प्रयत्नात वायुवीजनमध्ये अडथळा येऊ शकतो. यामुळे शेडमध्ये अमोनियाचे प्रमाण वाढते, याचा परिणाम कोंबड्यांच्या डोळे, श्‍वसन प्रणाली आणि शेवटी अंडी व मांस उत्पादनावर होतो. शेडमध्ये वाहणारी हवा ताजी असणे गरजेचे आहे. त्याकरिता शेडच्या बाजूला पुरेशी मोकळी जागा ठेवावी.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular