Homeमुक्त- व्यासपीठनारी शक्ती जागी व्हावी

नारी शक्ती जागी व्हावी

   ज्यावेळी भारतभूमीवर संकटे आली त्यावेळी अनेक थोर रत्नांचा जन्म झाला. त्यात काही पुरुष तर काही स्त्रिया होत्या. त्यांनी आपल आयुष्य देशासाठी समर्पित केलं. आपला भारत देश घडविला. त्यांचा संघर्ष मानवतेसाठी होता. देशातील जनतेने सुखाने, आनंदाने, गुण्यागोविंदाने एकत्र रहावे यासाठी होता. आपल्या भारत देशात देवांपेक्षा देवींचे मंदिर जास्त आहेत. प्रत्येक देवीची कथा ही राक्षस वधाची आहे. ज्या ज्या वेळेस अन्याय घडला त्या त्या वेळेस या राक्षसांना ,राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा देण्याचे कार्य या देवीने केले. नवरात्र उत्सवात या नारी शक्तीचा उदो उदो केला जातो. नारीशक्तीचे पूजन केले जाते.  जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले, माता रमाई,झाशीची राणी, राणी चेन्नम्मा या थोर स्त्रियांनी देश घडविण्यात मोलाचा वाटा उचलला. आजही सर्व क्षेत्रात स्त्रिया देश सेवा करत आहेत. 

स्त्री शक्ती राजकारण,समाजकारण,प्रशासन, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र,विज्ञान,अंतराळ यात आघाडीवर आहे. चित्र जरी आशादायी असले तरी आणखी कार्य करण्याची आवश्यकता आहे. देशात होणारे स्त्रियांवर हल्ले,अन्याय,अत्याचार,बलात्कार,स्त्रीभ्रूणहत्या, मुलगा-मुलगी भेदभाव यावर स्त्री शक्तीने कार्य करावे.
जग परग्रहावर चाललंय आणि आजही या 21 व्या शतकात स्त्रियांवर अन्याय होतोय ही मोठी शोकांतिका आहे. एवढी प्रगती होऊनही आज स्त्री सुरक्षित आहे का? हा खूप मोठा प्रश्न आहे.


भारत सरकार तर्फे ‘लेक वाचवा लेक शिकवा’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानातून हे समजते की मुलगी आजही सुरक्षित नाही.आजही ग्रामीण भागात शिक्षणापासून वंचित आहे. मुली आईच्या पोटात सुरक्षित नाहीत. स्त्री भ्रुण हत्या केली जाते. बंदी असूनही छुप्या मार्गाने गर्भपात चालूच आहे. समाजात महिला सुरक्षित नाहीत. निर्भया, कोपर्डी, हिंगणघाट, हाथरस अशा अनेक घटना घडत आहेत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटना आहेत.आजही काही लोक मुलगा -मुलगी भेदभाव करतात. मुलगा जन्माला आला तर पेढे वाटतात. आनंद व्यक्त करतात. मुलगी झाली तर दुःख होते. कळी उमलण्याआधी कापली जाते. शासन म्हणते,लेक वाचवा. पण ती वाचली तर नराधमापासून संरक्षण कोण देणार? गावागावात,शहरात टपून बसलेले डोमकावळे तिला फिरून देत नाहीत.अत्याचाराच्या घटना घडत आहेत. घरगुती हिंसाचार सुरू आहे. तिला काही घरात आजही दुय्यम वागणूक दिली जाते. घरातही स्वातंत्र्य नाही. बाहेर वावरताना मर्यादा. आज स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारला जातो.एक प्रकारे तिचे अस्तित्व नाकारले जाते.अशा कात्रीत आजची स्त्री आहे.
एकीकडे हत्या करणे पाप आहे. वाईट वागू नका. अहिंसा परमो धर्म, प्राणीमात्रावर दया करा. मंदिरात पार्वती, लक्ष्मी, दुर्गा, आदिमाया यांची पूजा होते. असा आपला धर्म. मग स्त्रियांवर अत्याचार करा, स्त्रीभ्रूणहत्या करा हे कोणत्या धर्मात आहे? ही विकृती कुठून आली? आपली भारत भूमी पवित्र पावन भूमी मानले जाते. भारतमाता म्हणून देशाला मातेचा दर्जा देणारी आपली संस्कृती. गंगा, गोदावरी, नर्मदा,सरस्वती या नद्यांची नावे स्त्रियांची. साडेतीन शक्तीपीठे देवींची. स्त्रीयांना मंदिरात पूजले जाते. देवतांच्या अगोदर स्त्रियांचे देवींचे नाव आहे. राधा-कृष्ण, सीता-राम, पार्वती शंकर. स्त्री शक्तींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटला. जिजामातेच्या प्रेरणेने, आशीर्वादाने रयतेचे, बहुजनांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे स्वराज्य उभे राहिले. जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवराय घडले. आज जिजाऊ सारखी स्त्री शक्ती जन्माला आली तर घरोघरी शिवबाच्या विचाराचे माणसं घडतील.
अहिल्यादेवी होळकर यांनी 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला. काश्मीर ते कन्याकुमारी लोककल्याणकारी कामे केली. अहिल्यादेवी यांनी आदर्श राज्यकारभार करून स्त्रीयांना आदर्श घालून दिला.आपणही सत्तेत जाऊन कार्य करू शकतो. हा आत्मविश्वास दिला.
सावित्रीबाई फुले यांनी ज्योतीबांच्या खांद्याला खांदा लावून कार्य केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महान कार्य केले. मुलींची पहिली शाळा काढून मुलींना शिकवले. क्रांतीज्योती यांचे कार्य आजच्या सावित्रीला पुढे न्यायचे आहे. शिक्षणाची गंगा वंचितांच्या दारी नेण्याचे कार्य हाती घ्यावे लागेल.
माता रमाईचे कार्य आपण विसरू शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मोठा आधार दिला.
याच देशात इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. एक कर्तबगार पंतप्रधान म्हणून इतिहासात नोंद आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स. राष्ट्रपती झालेल्या प्रतिभाताई पाटील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या किरण बेदी, पी. टी. उषा, मदर तेरेसा , अनाथांची माय सिंधुताई अशा अनेक स्त्रियांनी स्वतःच्या गुणांच्या कर्तुत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले देशाचे नाव मोठे केले.
आजही मेधाताई पाटकर, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण , सायना नेहवाल, हिमा दास अशा अनेक स्त्री शक्ती विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवत आहेत. तरीही ‘लेक वाचवा’ हा संदेश या भारत देशात दिला जातो. ही शोकांतिका आहे. स्त्रीजन्माचे स्वागत झाले पाहिजे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा नुसते ओरडून चालणार नाही. समाजातील सुशिक्षित स्त्रियांनी पुढे यावे. पुरुषी छळापेक्षा घराघरात स्त्री स्त्रीचा छळ करते. सासू-सून, नणंद -भावजय वाद सुरू असतो. स्रियांनी स्त्रियांचे प्रबोधन करावे. कुणीतरी येईल आपले संरक्षण करेल याची वाट पाहू नका. तुमच्यातच ती शक्ती आहे. गरज आहे ती शक्ती जागी करण्याची. स्वसंरक्षणाचे धडे स्त्रियांनी घ्यावे. आज शिकलेली स्त्री समाजात पुढे येत नाही. ती स्वार्थी वृत्तीने वागू लागली. पोथी पुराणात गढून गेली. उपवास करून कृश झाली. ती तिची शक्ती विसरली. बुवा, बापू, अम्मा यांच्या अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडली. आज तिने विज्ञानवादी बनावे. चिकित्सा करावी. सत्य समजून वाटचाल करावी. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी स्त्रियांनी एकत्र यावे. माझे घर, गाडी, नवरा,मुलगा, संसार हे करताना समाजकार्य करावे. हे होताना दिसत नाही. स्त्री शक्तीच स्त्रियांचा उद्धार करू शकते. आणि या 21व्या शतकात सुरक्षित राहू शकते.
समाजात अनेक महिला शिक्षिका आहेत. शाळेत मुलांना संस्काराचे, प्रबोधनाचे धडे देतात.या शिक्षिकांनी गावागावात स्त्री चळवळ उभी करावी. सत्य असत्य समजून सांगावे. शाळेत महिला मेळावे घेऊन प्रबोधन करावे. आपण शाळेचेच नव्हे तर समाजाचे शिक्षक व्हावे. मार्गदर्शक व्हावे. समाजातील महिलांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून, अज्ञानातून बाहेर काढावे.
राजकारणातील महिलांनी स्वतः निर्णय घेण्याची तयारी ठेवावी. ज्या पदावर आपण आहोत त्या पदाचा अभ्यास करावा. नाहीतर समाजात महिला पदाधिकारी अन कारभार पती, मुलगाच पाहतो. हे चित्र बदलले पाहिजे. त्या पदाचा वापर करून स्त्रीने कार्य करत राहावे.
ज्या महिला डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका आहेत. त्यांनी गावोगावी जाऊन महिलांना आरोग्यविषयक माहिती द्यावी. हे सर्व शक्य आहे पण गरज आहे इच्छाशक्तीची. तरच मुलगी वाचेल ती शिकेल. स्वतःच्या पायावर उभी राहील. स्त्री स्वावलंबी होईल. ती अबला नव्हे तर सबला होईल. घरोघरी स्त्रीजन्माचे स्वागत होईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांनी मुलींना तंत्रज्ञानाचे धडे द्यावेत.ज्या महिला पोलीस अधिकारी, प्रशासनात आहेत त्यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत. ज्यांना जे शक्य होईल त्यांनी तन-मन-धनाने कार्य करावे. स्त्री स्वावलंबी करणे हेच ध्येय बाळगून कार्य झाल्यास भारताचा सुवर्णकाळ पुन्हा येईल. मग कोणीही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार नाही.
समाजात अंगावर शहारे आणणार्‍या घटना घडतात. बलात्कार,अन्याय, अत्याचाराच्या घटना घडतात. या घटना का घडतात? हे करणारा कुणा स्त्रीचा तो मुलगा,पती,भाऊ असतो? महिलांनी आपल्या मुलाकडे, मुलीकडे लक्ष देण्याची गरज आहे. चांगले संस्कार करण्याची गरज आहे. नराधम वाईट माणसे बोटावर मोजण्याएवढे असतात. पण चांगली माणसे शांत असतात म्हणून त्यांचा उपद्रव वाढत असतो. या वाईट प्रवृत्तींना वेळीच लगाम घालावा लागेल. त्यांना स्त्रीशक्तीने ठेचून काढावे. ही सर्व स्त्रियांची स्त्रीशक्तीची जबाबदारी आहे. किती दिवस म्हणणार स्त्री अजूनही सुरक्षित नाही. ती सुरक्षित रहावी यासाठी प्रयत्न हवेत. ते प्रयत्न स्त्रियांनी पुढे येऊन केले तर उत्तमच होईल. स्त्रिया स्त्रियांचे प्रश्न समजावून घेऊ शकतात. 21 व्या शतकात सर्व क्षेत्र काबीज करणारी स्री सुरक्षित नाही.
स्वावलंबी सक्षम व्हावी
21व्या शतकातली नारी
तिच्या कार्याला मग
वंदन करेल दुनिया सारी
आज मुली गल्ली ते दिल्ली सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैज्ञानिक, कृषी, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासन, संगणक क्षेत्रात महिला काम करत आहेत. स्त्री आणि पुरुष हे या देशाची दोन चाके आहेत. रथ एका चाकावर चालत नाही. दोन्ही चाके मजबूत हवी. यातील एक चाक बाजूला गेले तरी देशाचा गाडा चालणार नाही.
स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे , राजाराम मोहनराय अशा समाजसुधारकांनी महान कार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांच्या उद्धारासाठी कायदा केला. देशाची प्रगती स्त्रीयांना वगळून होणार नाही. आज स्त्रियांसाठी अनेक कायदे आहेत.स्रियांनी त्याचा अभ्यास करावा.
भारत देश प्रगतशील जागतिक महासत्ता करायचा असेल तर ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ ही मोहीम यशस्वी रीतीने राबवली पाहिजे. स्त्री शक्ती जागी झाली पाहिजे. जर मुलगी वाचली मुलगी शिकली तरच कुटुंब सुधरेल. कुटुंब सुधारले तर समाज पुढे जाईल. समाज सुधारला तर राष्ट्र प्रगत होईल. गरज आहे मुलीला वाचविण्याची. गरज आहे मुलीला शिकविण्याची. तरच उन्नती होईल भारत मातेची.समस्त माता-भगिनींना, स्त्री शक्तींना आवाहन करतो की,स्वस्थ बसून चालणार नाही, उठा जागे व्हा. या 21 व्या शतकातली जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे.ती पेलण्यासाठी समर्थ बना.

  घ्यावी जबाबदारी आज
  प्रत्येक नारीने आण घ्यावी
  स्व कर्तुत्वाची उत्तुंग भरारी
  नारी शक्ती जागी व्हावी ...

   लेखक-श्री.किसन अर्जुन आटोळे
        ( प्रा.शिक्षक )
      जि.प.प्रा.शाळा.मलठण
      ता.कर्जत जि.अहमदनगर 

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303


लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी *लिंक मराठी* हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी . 
    तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.
      
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular