Homeवैशिष्ट्येभारतीय स्वातंत्र्य चिरायु होवो, समृद्ध होवो!

भारतीय स्वातंत्र्य चिरायु होवो, समृद्ध होवो!

(१) १५ अॉगस्ट, १९४७ रोजी आम्ही भारतीय ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आणि भारत देश म्हणून स्वतंत्र झालो.याच दिवशी आम्ही भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन देशभर साजरा केला. तेंव्हापासून दरवर्षी १५ अॉगस्ट रोजी आम्ही भारताचा स्वातंत्र्य दिन एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करीत असतो. आज १५ अॉगस्ट, २०२१ हा दिवस भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे व भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन आहे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून आज रोजी ७४ वर्षे पूर्ण झाली.

(२) आपल्या स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. भारताचा हा तिरंगी झेंडा भारताच्या विविधतेत असलेल्या एकात्मतेचा संदेश देतो. या राष्ट्रध्वजाचा केशरी रंग हा त्याग व धैर्याचे प्रतीक आहे, पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक आहे, हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे, तर मधोमध असलेले निळ्या रंगाचे अशोकचक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे. खरं तर अशोकचक्रासह भारताच्या राष्ट्रध्वजात चार रंग दिसतात, ते म्हणजे केशरी, पांढरा, हिरवा व निळा. वरील अर्थाशिवाय या राष्ट्रध्वजातील इतर तीन रंगांचे वेगवेगळे अर्थ पण काढले जातात. ते म्हणजे केशरी अर्थात भगवा रंग हिंदू समाजाचे प्रतीक, हिरवा रंग मुस्लिम समाजाचे प्रतीक, तर निळा रंग मागास समाजाचे प्रतीक. एकात्मतेऐवजी धार्मिक व जातीय भेदाभेदाचा, फुटीचा असा संदेश राष्ट्रध्वजातून देणे चुकीचे आहे.

(३) स्वतंत्र भारत हे एक बलाढ्य संघराज्य आहे. या भारतीय संघराज्याला भारताची स्वतंत्र राज्यघटना आहे. या राज्यघटनेनुसार भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतीय राज्यघटना हा या धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा राष्ट्रीय धर्मग्रंथ व राष्ट्रीय कायदा आहे. या धर्मग्रंथाचे व कायद्याचे पावित्र्य राखणे, सन्मान करणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.

(४) भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा स्वातंत्र्य दिन हा जसा आनंदाचा दिन, तसा वेदनेचाही दिन! स्वातंत्र्याच्या आनंदाबरोबर एक संवेदनशील भारतीय म्हणून मला वेदना होत आहे ती म्हणजे अखंड भारताच्या धार्मिक फाळणीची व त्या फाळणीतून निर्माण झालेल्या भारत व पाकिस्तान देशांमधील शत्रुत्वाची, चिघळत पडलेल्या काश्मीरच्या प्रश्नाची, भारतातील धार्मिक व जातीय विद्वेषाची, भारतातील मूठभर श्रीमंतांच्या कचाट्यात सापडलेल्या बहुसंख्य, बहुजन, गरीब समाजाच्या आर्थिक गुलामगिरीची, बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची, अत्याचाराची व दहशतवादाची! भारत जेंव्हा या सर्व वेदनांपासून मुक्त होईल तेंव्हाच खरं तर भारताच्या राजकीय स्वातंत्र्याचे रूपांतर संपूर्ण स्वातंत्र्यात होईल. त्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या दिशेने आपण सर्व भारतीय प्रामाणिक प्रयत्न करूया, सतत संघर्ष करूया!

(५) स्वतंत्र भारताच्या इतिहासात आपल्याला हा स्वातंत्र्य दिन दुसऱ्यांदा मास्क लावून व शारीरिक अंतर ठेवून साजरा करावा लागतोय व त्याला कारण आहे कोरोना! अज्ञान व गरिबी यांनी अगोदरच ग्रासलेला आपला भारत देश सद्या जगाबरोबर या कोरोनाच्या संकटाशीही सामना करतोय. तरीही भारताने एकाच वर्षात करोनावर लसी निर्माण केल्या व आता हळूहळू का असेना पण भारतीयांचे लसीकरण सुरू आहे. आपला देश या व अशा अनेक संकटावर मात करीत पुढे जात आहे. आपला भारत देश लवकरच कोरोनामुक्त व भयमुक्त होईल व शिक्षण, उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय यात पुन्हा पूर्वीप्रमाणे व्यस्त होईल व जगात एक सशक्त व आत्मनिर्भर देश म्हणून प्रगती करील याची खात्री आहे.

(६) भारतीय संविधानाचे कलम/अनुच्छेद ३७० रद्द झाल्याने जम्मू काश्मीरचा स्वतंत्र दर्जा रद्द झाला व त्यामुळे भारताच्या या प्रदेशात आता आपला तिरंगा झेंडा डौलाने फडकत आहे ही स्वातंत्र्योत्तर काळातील एक अभिमानाची गोष्ट आहे.

सर्व भारतीयांना ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारतीय स्वातंत्र्य चिरायु होवो, समृद्ध होवो! जय हिंद!

  • ॲड.बी.एस.मोरे

Wishing you all Indians 75th happy independence day! Jai Hind! – Adv.B.S.More

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular