Homeमुक्त- व्यासपीठविच्छा माझी पुरी करा!

विच्छा माझी पुरी करा!

एखाद्या स्त्रीला अमिताभ बच्चन नवरा असावा असे वाटत राहील तर एखाद्या पुरूषाला हेमा मालिनी बायको असावी असे वाटत राहील पण शेवटी वाट्याला आलेल्या जोडीदाराबरोबर संसार करावा लागेल, इच्छेचे काही खरं नाही.

एखाद्या गायक, गायिकेला चित्रपट सृष्टीत पार्श्वगायक, पार्श्वगायिका म्हणून पुढे यावे असे वाटत राहील पण शेवटपर्यंत अॉर्केस्ट्रातच गायक, गायिका म्हणून काम करावे लागेल, इच्छेचे काही खरं नाही.

एखाद्या क्रिकेट खेळाडूस सचिन तेंडुलकर सारखे मोठे व्हावे असे वाटत राहील पण शेवटपर्यंत गल्लीतला क्रिकेट खेळाडू म्हणून जगावे लागेल, इच्छेचे काही खरं नाही.

एखाद्या छोट्या उद्योजकाला अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला सारखा मोठा उद्योजक व्हावे असे वाटत राहील पण शेवटपर्यंत छोट्या उद्योगातच समाधान मानावे लागेल, इच्छेचे काही खरं नाही.

एखाद्या डॉक्टरला मोठा नामांकित डॉक्टर व्हावे असे वाटत राहील पण शेवटपर्यंत छोट्या दवाखान्याचा छोटा डॉक्टर बनून रहावे लागेल, इच्छेचे काही खरं नाही.

एखाद्या वकिलाला राम जेठमलानी सारखे वकिलीत मोठे नाव व्हावे असे वाटत राहील पण शेवटपर्यंत पोटापुरता पैसा मिळवणारा वकील होऊन जगावे लागेल, इच्छेचे काही खरं नाही.

एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला नगरसेवक, मग पुढे आमदार, मग पुढे राज्याचा मंत्री, मग पुढे राज्याचा मुख्यमंत्री, मग पुढे देशाचा केंद्रीय मंत्री, मग पुढे देशाचा पंतप्रधान व्हावे असे वाटत राहील पण शेवटपर्यंत साधा कार्यकर्ता फार तर पक्षाचा एखादा पदाधिकारी बनून रहावे लागेल, इच्छेचे काही खरं नाही.

इच्छेची वरील काही ठळक उदाहरणे. इच्छा असणे, त्या पूर्ण करण्याच्या महत्वाकांक्षा असणे, त्यासाठी जोराचे प्रयत्न करणे हे सर्व ठीक आहे. पण इच्छापूर्तीची साधने सर्वांच्या वाट्याला समान येत नाहीत व नशिबाचाही भाग असतो (काही लोक नशिबाला योगायोगाचा भाग म्हणतात). मग सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण कशा होणार? पण मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून काय निराश व्हायचे? आपल्यापेक्षा वर असलेल्या काही लोकांकडेच का बघायचे? छोट्या इच्छा पूर्ण होताना त्यातच मोठे समाधान मानणारी आपल्यापेक्षा कितीतरी खाली असलेली असंख्य माणसे याच समाजात आहेत मग त्यांच्याकडे का बघत नाहीत ही वर बघणारी इच्छाधारी माणसे? काही माणसे तर त्यांच्या मोठ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला मोठे नवस करतात व विच्छा माझी पुरी करा म्हणतात. धन्य धन्य नेहमी वरच बघणाऱ्या या इच्छाधारी माणसांची!

  • ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular