श्रीमंती

           श्रीमंत होणं कोणाला आवडत नाही?  पण कुणाच्या घरात जन्माला यायचं जसं मनुष्याच्या हातात नसतं तसंच श्रीमंत आणि गरीब राहणं ही आपल्या हातात नसतं.कारण दैवगतीच्या या फेऱ्यात फासे उलटे पडतात की सुलटे ते काही सांगू शकत नाही. आपली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी हरेकजण प्रयत्नशील असतो. अगदी सात पिढ्या बसून खातील अशी परिस्थिती असली तरी पैसे कमवण्याची आणि अजून श्रीमंत होण्याची माणसाची प्रवृत्ती असते. बालपण खूप कष्टात गेल्यानंतर काही माणसं स्वबळावर श्रीमंत होतात. परंतु त्यापाठीमागे त्यांचे कष्ट मेहनत आणि नशिबाचा भाग असतो. पूर्वजन्मीचे संचित त्याला वैभव मिळवून देते. त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी बळ मिळते. पैशाने श्रीमंत होणे शक्य होते पण मनाची श्रीमंती असणे फार फायद्याचे असते.
         आर्थिक श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोळतो. वैभवात जीवन संपन्न करतो. भौतिक सुखाचा आस्वाद घेतो परंतु टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी माफकच अन्न आवश्‍यक असते. त्यासाठी लाखो करोडो रुपये असणे गरजेचे नसते. आपल्या जिवाला सुखी ठेवण्यासाठी आज गाद्या गिरद्यावर  लोळत राहिले तर उलट सुखाऐवजी दुःखच मिळते. शरीराला व्यायाम न करता खाऊन पिऊन सुस्त राहिले तर निरनिराळे आजार, व्याधी चिकटतात. त्यामुळे शरीराला काम आणि मेहनत यात जेवढे व्यस्त ठेवता येईल तितके ठेवत राहणे त्यामुळे शरीर तंदुरुस्त शरीर असेल तर पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनुष्य सुखात राहू शकतो. म्हणूनच म्हटले आहे ' health is wealth'.  शरीर निरोगी असणे मन प्रसन्न असण्याची लक्षणे आहेत. ज्याच्याकडे श्रीमंती असेल तर जगातील श्रीमंत व्यक्ती होय. दिवसभर कष्ट करून रात्री पोटभर जेवण खाऊन आठ तासांची गाढ निद्रा घेतली की शरीर आपोआपच तंदुरुस्त राहते आणि कोणताही रोग चिकटत नाही.
                    यासारखे सुख ते काय! याउलट लाखो रुपयांची उलाढाल असेल आणि पैशाच्या राशीत लोळत असेल. शरीराला रोगाने आपले घर बनवले असेल. रात्र-रात्र झोपेविना फोमच्या गादीवर तळमळत पडत असेल तर ही असली श्रीमंती काय कामाची! घरी आलेल्या आप्तेष्टांची हसुन, गोड बोलून राहिले, कुटुंबात सुखसंवाद असेल, मुलाबाळांवर सुसंस्कार असतील दोन वेळेचे पोटभरून खाऊ शकेल तर ती व्यक्ती समाधानी असते. मनाने श्रीमंत असते. प्रत्येक व्यक्तीच्या श्रीमंतीच्या व्याख्या निरनिराळ्या असतात. कोणाला पैशाच्या श्रीमंतीचा हव्यास असतो, तर कोणी मनाची, स्वभावाची श्रीमंती पत्करतो. या जीवनात चार मित्र जोडून राहिले आप्तगणांशी चांगले वागले आणि घरच्यांसाठी पुरेसा वेळ देऊ शकलो तर माझ्या मते ती खरी श्रीमंती होय!
      आपण जर आपल्या कुटुंबाचेच बनू शकत नसेल तर इतरांचे काय बनणार? वेळेला हीच माणसे उपयोगी पडत असतात. तसेच कोत्या वृत्तीमुळे माणुसकी टिकत नाही. माणूस गरजेच्या वेळी धावून येत नाही. पैसा दरवेळी उपयोगी पडेल असे नसते. कधी कधी पैशापेक्षा माणूस जवळ असणे किंवा मित्रांची सोबत असणे मनाला दिलासा देते. शेवटी प्रेम, माया, जिव्हाळा पैशाने विकत घेता येत नाही, तर ती आपल्या वागण्याने, स्वभावाने मिळवावे लागते. पैशाने नोकर खरेदी करू शकतो परंतु आपल्या जवळचे आप्तसंबंधी प्रेमाने करू शकतात तिथे हे भाड्याचे तट्टू काय देणार ? मलालात राहूनही दारिद्र्याने गांजलेले राहणार. समोरच्या व्यक्तीशी हसून, प्रेमाने संभाषण केले तर ती व्यक्तीही बदल्यात प्रेम देईल. राग, तिरस्कार, घृणा आणि दादागिरी माणसातील नाती तोडतात. संबंध दुरावतात. कितीही पैशाचा राशी ओतल्या तरी पुन्हा एकजीव होऊ शकत नाहीत.
          श्रीमंत होण्यासाठी सुंदर साधा उपाय म्हणजे जीभेवर नियंत्रण असायला हवे. ज्याची वाणी गोड त्याचे सर्वच गोड! त्यामुळे समोरच्या व्यक्तीला पटकन बोलून तोडणे जसे जीभेवरील अनियंत्रण निर्देशित करते तसे गोड बोलण्याने नाती टिकून राहतात. प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे असते. प्रेम देणे आणि घेणे आपल्या हातात असते. ते पैशाने विकत घेता येत नाही. आपल्या स्वभावावर अवलंबून असते. मनाची श्रीमंती टिकवायची तर पैशाची श्रीमंतीही फिकी पडावी. कारण ज्या माणसाकडे गोड शब्दांची, सद्वर्तनाची, सदाचाराची श्रीमंती असेल त्याचे नाव जगात रोशन होईल. देवाजीने हा सुंदर मानवी जन्म दिला आहे. रिक्त हस्ताने जन्माला येतो आणि मृत्यूनंतर रिक्त हस्तानेच परततो. मग कशाला हवा पैशाचा इतका सोस? माणसे टिकवण्याची श्रीमंती मेल्यानंतरही उपयोगी पडेल. 'मरावे परी कीर्तिरूपे उरावे' हेच खरे! नाहीतर जन्माला आला, जगला, खाल्ला आणि मेला. असले जीवन असेल तर दूरचे सोडा पण परिवारातील लोकही आपले स्मरण करणार नाहीत. तुम्ही आयुष्यभर पै पै  करून जमविलेल्या धनाचा उपभोग घेतील आणि तुमच्या नावाचा उद्धार करतील म्हणून मानवाने हा धडा जरूर घ्यावा. तोंडाने मिठास वाणी आणि चेहऱ्यावर फुललेले हसू हे श्रीमंतीचे लक्षण समजून वागावे." धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हावे"आणि त्याच श्रीमंतीचा आस्वाद, लाभ घेत एक दिवस परतीचा मार्ग धरावा........

सौ.भारती सावंत
मुंबई

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular