Homeमुक्त- व्यासपीठसंकट कोरोनाचे….आपली जबाबदारी…

संकट कोरोनाचे….आपली जबाबदारी…

संपूर्ण जगभर कोरोनाची भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीत आपल्या देशात काय घडत आहे आणि काय घडले हे मी सांगायला नको, कारण ही परिस्थिती सर्वांना ठाऊक आहे.
या काळात आपल्या जवळचे किंवा नात्यातलेच लोकं दगावले आहेत, आपण सर्वांनी हे जवळून पाहिले आहे.
आपल्याच जवळच्या माणसांनी आपल्याला निस्वार्थपणे केलेली मदत, आपण सर्वांनीच आपापल्या डोळ्यांनी पाहिली आहे. आणि हे विसरताही येणार नाही.

देशाची परिस्थिती आज खूपच भयावह आहे, असे असले तरी, पहिलं आपण आपले गाव कसे आणि कोणत्या प्रकारे कोरोनामुक्त करू शकू याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. कोरोना संपवण्यासाठी सरकारने ज्या उपाय-योजना केलेल्या आहेत त्याचा उपयोग आपण करून घ्यायला हवा. त्यासाठी आपण स्वतः प्रत्येकाने आधी यासाठी पुढे यायला हवं.
माझं घर, माझी वाडी, माझा गाव सुरक्षित तेव्हाच होईल, ज्यावेळी मी सुरक्षित आहे, असे आपल्याला प्रत्येकाला वाटेल तेव्हाच आपण सर्व सुरक्षित आहोत असे म्हणता येईल.

काय आहे ना !
आपले एक मत असते की, मला काहीच होणार नाही, मी धडधाकट आहे, चालतोय, फिरतोय, खातोय, पितोय सर्व काही सुरळीत चालू आहे, मग मला कशाला कसली धाड भरणार आहे.
मी बरा आहे आणि मला काहीच होणार नाही;
हे असे बोलणे आधी सर्वप्रथम आपण थांबवलं पाहिजे, ज्यावेळी काही घडते त्यावेळी ती आलेली वेळ कोणालाही सांगून येत नाही. आज पर्यंत या कोरोनाने किती बळी घेतले याची आकडेवारी आपल्या सर्वांनाच माहिती आहे, वेगळी सांगण्याची गरज वाटत नाही, शिवाय रोज घडणाऱ्या घटना आपण पाहतोय व आपल्या कानावर दैनंदिन येतच असतात.

आपल्या प्रत्येकाच्या घरातले सर्व सदस्य ज्यावेळी लसीकरण करून घेतील त्याचवेळी आपलं घर, आपली वाडी, आपला गाव सुरक्षित होईल;
नाहीतर एक दिवस असा येईल की, आपण ओरडून सांगत होतो, कोरोना-फिरोना काही नाही आहे; बिनधास्त मजेत राहायचं, खायचं, प्यायचं, अगदी इकडे तिकडे उड्या मारत हिंडायचं नि आपल्याच घरातल्या माणसासाठी डॉक्टरचे दोन शब्द आपल्याच कानाने ऐकायला जड जायचं आणि डोक्याला हात लावून बसायची पाळी आपल्यावरच यायची;
ही परिस्थिती जर आपल्यावर ओढवून घ्यायची नसेल तर मात्र सर्वांना लसीकरण करणे गरजेचे आहे.

सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा किती आहे हेही सर्वांना माहीत आहे, वेळेवर तेही मिळत नाहीय, आपण आपल्याच गरजेसाठी दरवर्षी लाखो झाडे तोडतो आणि वृक्षारोपण करताना मात्र एक झाड लावताना सेल्फी काढतो आणि देतो व्हायरल करून, लाईक आणि कमेंटच्या या विश्वात भांबावून जाऊन, आज उद्भवलेल्या परिस्थितीला तोंडही आपल्यालाच द्यावे लागते, अशा आलेल्या संकटांनाही आपणच जबाबदार असतो.

गावाच्या ठिकाणी आपण नेहमी पाहतो ना, बैलांना मुसकी लावलेली असतात, त्याचप्रमाणे आपण निसर्गाशी वाईट वागलो म्हणूनच आपल्याला निसर्गाने ही मास्क रुपी मुसकी लावण्यास भाग पाडले आहे. हे उदाहरण जरी हसण्यासारखे असले तरी कैक पटीने ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी.
असे मास्क लावून राहणे कायमच कोणाला पसंत होणार आहे, नाही ना !
मग प्रत्येकाला लसीकरण करून घेऊन या संकटापासून मुक्त व्हायलाच हवं.

प्रत्येक गोष्ट राजकीय पक्ष आणि समाज सेवकांवर टाकून चालत नाही, जनतेलाही तितक्याच तत्परतेने त्यात सहभाग दाखवता आला पाहिजे, जनतेनेही ती जबाबदारी स्वतःपुरती जरी स्वीकारली तरी या संकटातून आपण सहजच बाहेर पडू शकतो.
आपला गाव कोरोना नावाच्या या विळख्यातून सोडवायचा असेल तर १००% लसीकरण हे झालेच पाहिजे, असे प्रत्येक गावाने केले तर नक्कीच – तालुका, जिल्हा, राज्य, आणि देश या विळख्यातून मुक्त होईल.

  • विजय वैशाली दत्ताराम पराडकर – आण्णा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular