संस्कार म्हणजे सदाचरण. मानवी जीवनातील कर्म ज्याला नैतिकतेची जोड आहे. संस्कार हा कर्माचा एक असा भाग आहे जो संस्कृती मधून जन्माला येतो. संस्कृती टिकली तर संस्कार टिकतात आणि संस्कारी कर्मातूनच संस्कृती जन्माला येते. हिंदु धर्मात संस्कृती आणि संस्कार या दोन्ही गोष्टीना खूप महत्व आहे. आणि हि हिंदु संस्कृती टिकून राहावी म्हणून आपल्या पूर्व ऋषीमुनींनी प्रत्येक मानवी जीवाला संस्काराने जोडून घेतले आहे. आईच्या गर्भात गर्भ निर्माण होण्यापासून ते व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत वेळो वेळी कोणकोणते संस्कार केले जाणे अपेक्षित आहे याबद्दल ऋषी मुनींनी खूपच सखोल अभ्यास करून मानवी जीवाला संस्कार क्षम बनवण्याचा प्रयत्न केला.
हिंदू धर्मात पूर्वापार १६ संस्कार सांगितलेले आहेत. याशिवायही काही संस्कार केले जातात ते परंपरेने केले जातात. मूळ सोळा संस्कारात ते समाविष्ट नाहीत. जसे षष्ठी पूजन, प्रथम वाढदिवस, प्रथम केशखंड (जावळ), विद्यारंभ वगैरे.
सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारनेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे. गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे.
अनेक ग्रंथामध्ये या संस्काराच्या विषयावर लिखाण केले गेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचा हि विषय आहे. संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत पुरुष निर्माण व्हावे. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) :
१. गर्भाधान Conception
२. पुंसंवन Fetus protection
३. सीमंतोन्नयन To satisfy wishes of the pregnant Mother
४. जातकर्म Childbirth
५ . नामकरण Naming Child
६ . निष्क्रमण Taking the child outdoors
७ . अन्नप्राशन Giving the child solid food.
८ . जावळ: Hair cutting.
९ . कर्णवेध :Ear piercing
१० . उपनयन : Sacred thread
११ . वेदारंभ Study of Vedas and Scriptures
१२ . समावर्तन : Completing education
१३ . विवाह Marriage
१४ .वानप्रस्थ : Preparing for Renouncing
१५ . सन्यास ; Renouncing
१६ . अंत्येष्टी : Last rite, or funeral rites
हे १६ संस्कार आणि त्याचे महत्व पुढील प्रमाणे समजून घेऊयात.
गर्भाधान संस्कार:
१ . गर्भाधान –
गर्भाधान म्हणजे पती पत्नीचे मिलन होऊन स्त्रीच्या गर्भात गर्भाची स्थापना होणे. शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या विवाहानंतर पती आणि पत्नीला शारीरिक मिलनाची नैतिक परवानगी मिळते. तसेच सृष्टीचे प्रजनन सत्र सत्र सुरु राहण्यासाठी पती पत्नीचे शारीरिक मिलन जरुरी असते. या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाते. योग्य गर्भधारणा होऊन पिंडशुद्धी व्हावी या दृष्टीने हा संस्कार केल्या जातो. या संस्काराचे महत्व सांगणारी एक कथा देखील आहे. आई आणि वडील असे दोघे दैत्य कुळातील असून देखील त्यांच्या पोटी भक्त प्रह्लाद जन्माला आला. असे म्हणतात कि देवर्षी नारद मुनींनी गर्भ धारणेच्या आधी भक्त प्रह्लादाच्या आईला गर्भाधान संस्काराचे महत्व समजावून सांगितले होते . आजच्या काळात लग्न झाल्यानंतर साधारणपणे २ दिवसानंतर सत्यनारायणाच्या पूजेद्वारे गर्भाधान संस्काराचे महत्व सांगितल्या जाते. गर्भाधान हा मानवाचा प्रथम जन्म मानायला हरकत नाही कारण कि या संस्काराद्वारेच गर्भाची निर्मिती होते.
2 . पुंसवन संस्कार –
हा संस्कार स्त्रीने गर्भधारणा केल्यावर साधारणपणे तिसऱ्या महिन्यात केला जातो. सुदृढ संतती जन्माला येण्याच्या उद्देशाने हा संस्कार केला जातो. वैद्यक शास्त्रानुसार गर्भधारणे नंतर साधारणपणे ४ महिन्यापर्यंत लिंगभेद होऊ शकत नाही म्हणून मुलगा किंवा मुलगी हा भेद न केला जावा म्हणून हा संस्कार तिसऱ्याच महिन्यात केला जातो. तसेच तिसऱ्या महिन्यानंतर गर्भातील शिशूचा मेंदू विकसित होण्यास सुरुवात होते आणि शिशु गोष्टी आत्मसात करायला सुरुवात करतो म्हणून देखील हा संस्कार केल्या जातो. या संस्काराचे एक उदाहरण म्हणजे एका कथेनुसार अभिमन्यूने माता द्रौपदीच्या गर्भातच चक्रव्यूह नीतीचे ज्ञान मिळवले होते.
३ . सीमंतोन्नयन संस्कार-
सीमंतोन्नयन याचा अर्थ पत्नीच्या मस्तकातील पंचसंधास सीमांत असे म्हणतात. त्याचे उन्नयन म्हणजे वृद्धीकरण करण्या करिता सीमंतोन्नयन संस्कार करतात. हा संस्कार साधारणपणे गर्भ धारणेनंतर सहाव्या किंवा आठव्या महिन्यात केला जातो. याच संस्काराला डोहाळ जेवण असे देखील म्हणतात. सीमंतोन्नयन म्हणजेच सौभाग्य संपन्न होणे. या संस्काराद्वारे सौभाग्यवती स्त्रिया एकत्र जमून गर्भवती स्त्रीचे कौतुक करतात तसेच तिच्या मन प्रसन्न राहण्याची कामना करतात. तसेच या संस्काराद्वारे गर्भवती स्त्री शिशुमध्ये चांगले गुण, विचार यावेत म्हणून त्या पद्धतीनेच स्वतःला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असते.
४ . जातकर्म संस्कार-
हा संस्कार बाळ जन्माला आल्यानंतर त्याची नाळ कापण्याआधी केला जातो. या संस्काराद्वारे वैदिक मंत्राचे उच्चारण करून वडिलाद्वारे बाळाला मध आणि दही दिल्या जाते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली जाते. या नंतर माता बाळाला स्तनपान सुरु करते. पण काळाच्या ओघात हा संस्कार काहीसा मागे पडला आहे. पूर्वी स्त्रीची प्रसूती होताना ती घरीच होत असे पण आता दवाखान्यात होत असल्या कारणाने हा संस्कार करणे शक्य होतेच असे नाही.
५ . नामकरण संस्कार –
नामकरण म्हणजे जन्माला आलेल्या बाळाचे नाव ठेवणे. बाळ जन्माला आल्यावर बाराव्या दिवशी नामकरण संस्कार केल्या जातात. बाळाच्या कुंडलीवरून त्याचे जन्मनाव ठेवल्या जाते. कदाचित हे आपल्या पैकी खूप कमी जणांना माहित असेल पण प्रत्येक व्यक्तीचे २ नाव असतात. एक जन्म नाव आणि दुसरे व्यावहारिक नाव जे आपण दैनंदिन जीवनात वापरतोत. व्यावहारिक नाव ठेवण्याच्या सोहळ्याला आपण बारसे म्हणतो. बरेच वेळेस जन्म नाव आणि व्यावहारिक नाव हे वेगवेगळ्या दिवशी ठेवल्यामुळे हा संस्कार २ वेळेस पार पडतो.
६ . निष्क्रमण संस्कार –
निष्क्रमण म्हणजे बाहेर घेऊन जाणे. हा संस्कार बाळ जन्माला आल्यावर साधारणपणे चौथ्या महिन्यात पार पडतात. यामध्ये बाळाला सूर्य आणि चंद्र प्रकाशात नेले जाते. सूर्यासारखे तेज आणि चंद्रासारखी शीतलता शिशु मध्ये यावी हा त्यामागील मूळ हेतू आहे. या संस्काराचा अजून एक हेतू म्हणजे पंचमहा भूतांशी शिशूचा संबंध घडवून आणणे. पंच महाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश. या संस्कारातून एक वैज्ञानिक हेतू पण साध्य होतो. बाळाला सूर्य प्रकाशात घेऊन गेल्याने “ड” जीवनसत्व भेटण्यास मदत होते.
७ . अन्नप्राशन संस्कार –
हा संस्कार बाळ जन्माला आल्यावर साधारणपणे सहाव्या महिन्यात करतात. मुलगा असेल तर सहाव्या किंवा आठव्या महिन्यात आणि मुलगी असेल तर पाचव्या किंवा सातव्या महिन्यात हा संस्कार बाळावर पार पडल्या जातो. या संस्काराद्वारे देवतांची पूजा करून बाळाला पौष्टिक अन्न खायला दिल्या जाते. बाळाला अन्न भरवल्यावर त्याच्या पुढे कपडे, पुस्तके, शस्त्र ठेवल्या जातात. इथे शिशु ज्या वस्तूला हात लावेल ते त्याच्या चरितार्थाचे साधन असेल असे मानण्याची एक प्रथा आहे. हा संस्कार सहाव्या महिन्यात करण्याचे दोन कारण आहेत. एक म्हणजे शिशुला नुकतेच दात यायला सुरुवात झालेली असते तसेच पहिले सहा महिने शिशुसाठी आईचे दूध हा सर्वोत्तम आहार मानल्या गेला आहे. शिशुला सहा महिन्यानंतर आईच्या दुधा व्यतिरिक्त इतर पौष्टिक आहार मिळावा हा मूळ उद्देश आहे या संस्काराचा.
८ .चूडाकर्म संस्कार-
हा संस्कार शिशुच्या पहिल्या, तिसऱ्या किंवा पाचव्या वर्षी केला जातो. याच संस्काराला मुंडन संस्कार किंवा जावळ काढणे असे देखील म्हणतात. या संस्काराद्वारे शिशुच्या डोक्यावरील केस काढले जातात. शुद्धता हा या संस्काराचा मूळ हेतू आहे. शिशु नऊ महिने आईच्या पोटात वाढल्यावर आणि जन्माला आल्यानंतर त्याच्या डोक्यावरील केस हे दूषित मानल्या जातात. त्यामुळे या संस्काराद्वारे डोक्यावरील केस काढून बौद्धिक आणि शारीरिक शुद्धता करण्याची प्रथा आहे.
९ . अक्षरारंभ संस्कार-
हा संस्कार साधारणपणे बालकाच्या पाचव्या वर्षी केला जातो जेव्हा बालकाचे वय शिक्षा ग्रहण करण्यासाठी योग्य होते. या संस्काराद्वारे एखाद्या शुभ दिवशी सरस्वती पूजन करून बालकाद्वारे ओम असे लिहून घेतल्या जाते. याच संस्काराला विद्यारंभ संस्कार असे देखील म्हणतात. हा संस्कार पार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील बरीचशी कुटुंब हे बालकाला बासर येथील सरस्वती देवीच्या दर्शनासाठी घेऊन जातात.
१० .कर्णवेध संस्कार-
या संस्काराद्वारे बालकाचे कान टोचल्या जाते. या संस्काराद्वारे बरेच शास्त्रीय तसेच वैज्ञानिक हेतू साध्य केल्या जातात. कानाला छेद दिल्यानंतर त्याचा उपयोग अलंकार घालण्यासाठी केला जातो. तसेच कर्णवेधांमुळे राहू आणि केतूच्या प्रभावापासून बचाव होतो असा देखील समज आहे. कर्णवेधांमुळे मेंदूकडे जाणारा रक्त प्रवाह देखील सुरळीत होतो. तसेच यामुळे श्रवण शक्ती देखील वाढायला मदत होते. हा संस्कार अक्षरारंभ संस्कारानंतर मानला गेला असला तरी बरेच वेळेस बाळाचे कान हे पहिल्या वर्षीच टोचल्या जाते.
११ . उपनयन संस्कार –
या संस्कारालाच मुंज संस्कार असे देखील म्हणतात. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे घेऊन जाणे. म्हणजेच गुरु जवळ घेऊन जाणे. पूर्वीच्या काळी हा संस्कार केल्यानंतर बालकाला गुरु घरी पुढील शिक्षणासाठी घेऊन जाण्याची पद्धत होती. या संस्काराद्वारे बालकाला गायत्री मंत्राचा उपदेश केला जातो आणि त्याला तीन धागे असलेले जानवे म्हणजेच यज्ञोपवीत परिधान केल्या जाते. हे जानवे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे सूत्र मानल्या गेले आहे. हिंदू धर्मात हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य समाजात केल्या जातो. या तीन समाजात हा संस्कार करण्याचे एक कारण असे असू शकते कि पूर्वीच्या काळी हे तीन समाज गुरू घरी विद्या ग्रहणासाठी जात असत. पण काळानुसार हा संस्कार आजकाल फक्त ब्राह्मण समाजच करताना दिसतो. हा संस्कार बालकाच्या आठव्या वर्षी करणे अपेक्षित असते. तसेच या संस्काराद्वारे बालकाला ब्रहमचर्य व्रताचा उपदेश दिल्या जातो.
१२ . वेदारंभ संस्कार –
उपनयन संस्कारानंतर हा संस्कार पार पाडल्या जातो. हा संस्कार शिक्षा ग्रहणाशी निगडित आहे. प्राचीन काळी शिष्य गुरु घरी वेदाभ्यास करण्यासाठी जात असे. वेद म्हणजे ज्ञान आणि आरंभ म्हणजे सुरुवात करणे म्हणजे गुरु घरी जाऊन वेदांचा अभ्यास सुरु करणे. वेदांना भारतीय संस्कृतीत अति प्राचीन साहित्य तसेच ज्ञान भांडार मानले आहे. अध्ययनानुसार चार वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. वेदारंभ सुरु करण्याआधी गुरु आपल्या शिश्याना ब्रह्मचर्य व्रत तसेच सय्यमीत जीवन जगण्याची प्रतिज्ञा घ्यायला लावत कारण या दोन गोष्टींशिवाय वेदाभ्यास शक्य नाही असे मानल्या जात असे. काळाच्या ओघात आणि बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार या संस्काराचे स्वरूप काहीसे बदलले आहे किंवा मागे पडले आहे असे आपण म्हणू शकतोत.
१३ . केशान्त संस्कार:
केशान्त म्हणजे केसांचा अंत. प्राचीन काळी गुरुकुल मध्ये वेद अध्ययन पूर्ण केल्यावर गुरूंच्या समोर केस अर्पण करून म्हणजेच केशान्त करून हा संस्कार पार पाडल्या जायचा. या संस्काराद्वारे गुरुकुलचा निरोप घेणे आणि गृहस्थाश्रमाची सुरुवात करणे असा संस्कार मानल्या गेला आहे. बरेच वेळेस वेद अध्ययन सुरु करण्याआधी देखील केशान्त केले जायचे जेणे करून मस्तिष्क शुद्धी होऊन ठराविक दिशेने अध्ययन सुरु व्हावे.
१४ . समावर्तन संस्कार –
समावर्तन म्हणजे समाजात परत येणे. म्हणजेच गुरुकुल मधील शिक्षण पूर्ण करून समाजाचा घटक बनणे. मुंज संस्काराद्वारे घेतलेले ब्रह्मचर्य व्रत या संस्काराद्वारे सोडून गृहस्थाश्रम मध्ये प्रवेश करण्यासाठी विधी पार पाडल्या जातो. म्हणूनच या संस्काराला सोडमुंज असे देखील म्हणतात.
१५ . विवाह संस्कार –
विवाह संस्काराद्वारे स्त्री आणि पुरुष हे अग्नी तसेच समाज व नातेवाईंकांच्या साक्षीने पती पत्नीच्या भूमिकेत एकमेकांसोबत बंधनात बांधले जातात. हिंदू संस्कृती नुसार जे चार ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम सांगितल्या गेले आहेत. त्यातील गृहस्थाश्रमाची सुरुवात हि खऱ्या अर्थाने विवाह संस्कारानेच होती. विवाह संस्कार हा फक्त पती पत्नी किंवा संसारापुरताच मर्यादित नसून जन्म आणि मृत्यूचे स्रष्टी चक्र सतत चालू राहण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे योगदान देते. हिंदू हा एकमेव धर्म असून या विवाह संस्कारानुसार पती आणि पत्नीचा सात जन्माचा संबंध मानला गेला आहे. कदाचित या मान्यतेनुसारच लग्नात सप्तपदीचे देखील सात फेरे घेतले जातात. विवाह संस्कारालाच पाणिग्रहण संस्कार असे देखील म्हणतात. यातील ३ सर्वात महत्वाचे विधी म्हणजे लज्जाहोम, कन्यादान आणि सप्तपदी. सप्तपदीच्या विधीमध्ये पुरुष स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो त्यानंतर त्या दोघाना पती पत्नी म्हणून मान्यता मिळते.
१६ . अंत्येष्टी संस्कार: – हा संस्कार व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरावर केला जातो. या संस्काराद्वारे मृत व्यक्तीचे शरीर पंच महाभूतात विलीन होऊन कायमचे मुक्त होते. म्हणूनच या संस्काराला अंतिम संस्कार असे देखील म्हणतात. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश. मृत व्यक्ती पंचमहा तत्वात पूर्णपणे विलीन व्हावा म्हणूनच हिंदू संस्कृती नुसार मृत शरीराला दफन करण्याऐवजी दहन केल्या जाते. अंतिम संस्कारात यम देवतेची स्तुती केल्या जाते तसेच प्रार्थनेद्वारे अग्नीला मृत शरीर सामावून घेण्याची विनंती केल्या जाते.
इथे सर्व संस्कारांची माहिती घेतल्यावर मनात कदाचित एक प्रश्न निर्माण होऊ शकतो कि व्यक्तीच्या मृत्यू नंतर केले जाणारे दशक्रिया विधी आणि श्राद्ध हे वैदिक संस्कारात गृहीत धरल्या जात नाहीत का? हे दोन विधी संस्कारात गृहीत न धरण्याचे एक कारण असे असू शकते कि संस्कार हे मानवी शरीर आणि मनावर केले जातात तर दशक्रिया विधी आणि श्राद्ध हे आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात. म्हणूनच यास संस्कार न म्हणता फक्त विधी म्हणाल्या जाते.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मुख्यसंपादक