Homeकृषीजनावरे गाभण न राहण्यामागील कारणे

जनावरे गाभण न राहण्यामागील कारणे

फायदेशीर दुग्धोत्पादनासाठी जनावरांची विकसित जात आणि निरोगी जनावरांची योग्य देखभाल ठेवणे महत्त्वाचे असते. यासाठी जनावरांना नियमित संतुलित आहार पुरवावा आणि गाभण न राहण्यामागील कारणांवर पशुवैद्यकाकडून योग्य ते उपचार करावेत.
जनावरांची प्रजनन क्षमता आर्थिक उत्पादनाचा मुख्य आधार असते. प्रजननासंबंधीत अडचणींमुळे, दोन वेतामधील अंतर वाढल्यामुळे अनेक समस्या उदभवतात. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी वर्षातून प्रत्येक जनावरापासून ८ ते ९ महिन्यांपर्यंत दूध आणि एक निरोगी वासरू मिळायला हवे.
• रिपीट ब्रीडर्स किंवा पुनः गर्भधान :

  • गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर ५० ते ७० दिवसात नियमितपणे ऋतुचक्र यायला हवे. तसेच ९० ते १२० दिवसांत पुन्हा जनावर गाभण रहायला हवे. गाभण न राहिल्यास, जेव्हा गाय/ म्हैस तीनाहून अधिक वेळा २० ते २१ दिवसांच्या अंतराने पुन्हा माजाची लक्षणे दाखवते आणि प्रत्येकवेळी वळू किंवा कृत्रिम रेतनाद्वारे भरण करूनसुद्धा गाभण होऊ शकत नाही. अशा जनावरांना वैद्यकीय भाषेत ‘‘रिपीट ब्रीडर्स’’ किंवा ‘‘पुनः गर्भधान’’ च्या आवश्यकतेचे जनावर असे म्हणतात.
  • रिपीट ब्रीडर्स जनावरांमध्ये कोणतेही स्पष्ट किंवा विशेष आजाराची लक्षणे दिसून येत नाही. परंतु, जनावर प्रत्येक वेळी २० ते २२ दिवसांच्या अंतराने माजावर येते ,रेतन करूनही ते गाभण राहात नाही अशी लक्षणे दिसतात.
    • जनावरांमधील गाभण न राहण्यामागची कारणे :
    जनावरांच्या गाभण न राहण्यामागे अनेक कारणे असतात. ज्यामधे प्रामुख्याने पुढील कारणे दिसून येतात.
  • जनावरांच्या जननेंद्रियांमध्ये विशेष प्रकारच्या जीवाणूंच्या उदा. ब्रुसेला, ट्राईकोमोनास, लिस्टीरिया, कॅम्पिलोबॅक्टर इ. संक्रमणामुळे जनावरांमध्ये गर्भ राहात नाही. तसेच जनावरांच्या माजाची लक्षणे २० ते २१ दिवसांच्या अंतराने प्रदर्शित होत राहतात, यामुळे जनावरांमध्ये रिपीट ब्रीडिंगची समस्या उद्‌भवत राहते.
  • खनिजे तसेच व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील जनावर नियमितपणे गाभण राहू शकत नाही. दुधाळ जनावरांच्या आहारात दररोज ५० ग्रॅम खनिज मिश्रणे दिल्यास जनावरांच्या गाभण न राहण्यामागील समस्यांवर मात करणे प्रभावी ठरते.
  • गाभण जनावरांना योग्य व संतुलित आहार न देणे किंवा योग्य देखभाल न करने ‘‘रिपीट ब्रीडर्स’’ चे एक महत्त्वाचे कारण आहे.
  • काही वेळेस जनावरांच्या अंडाशयातील कमतरतेमुळे किंवा काही आवश्यक संप्रेरकाच्या कमतरतेमुळे देखील जनावर गाभण राहत नाही.
  • सामान्यतः उष्णतेमुळे किंवा उन्हाळ्यात म्हशींमध्ये माजाची सौम्य किंवा शांत लक्षणे दिसून येतात. अशावेळी म्हशींचा माज ओळखून जनावर भरवले नाही, तर रिपीट ब्रीडिंगची समस्या उदभवत राहते. अशावेळी पशुपालकाने जनावरांमधील माजाची लक्षणांवर नियमितपणे बारकाईने लक्ष ठेवावे.
  • योनीमार्गाच्या अपूर्ण वाढीमुळेदेखील जनावर गाभण राहण्यात अडथळे निर्माण होतात. गर्भाशयाची अपूर्ण वाढ, यामुळे जनावर गाभण राहात नाही.
  • अंडाशय वा अंडकोशाची झालेली अपूर्ण वाढ जनावरांच्या गाभण राहण्यात अडथळे तयार करते.
  • गर्भाशयाच्या आजाराबाबत असलेली जनावरांमधील अनुवंशिकतादेखील गर्भधारणेत अडथळे निर्माण करते.
  • नराच्या वीर्यातील शुक्रजंतूंची कमतरतादेखील जनावर गाभण न राहण्यास कारणीभूत ठरते.
  • गर्भाशयातील दाहामुळे गर्भ राहण्यात अडथळे तयार होतात. इ.
    • जनावरांतील माजाची लक्षणे :
  • सारखे हंबरणे व बैचेन होणे.
  • दूध उत्पादनात कमी येणे.
  • योनीतून पारदर्शक, चिकट द्रव बाहेर येणे.
  • योनीतील आतील भाग लालसर होणे व बाहेरील भागास सूज आल्यासारखे वाटणे.
  • इतर जनावरांना चाटणे, इतर जनावरांवर चढणे.
  • थोड्या थोड्या अंतराने अडकत लघवी करणे.
  • वारंवार शेपटी ताठ करणे किंवा वर-खाली करणे.
  • खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे इ. प्रकारची माजाची लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात.
  • संकलन – लिंक मराठी ( लेखात तज्ञाची मते विचारात घेतली आहेत. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टर शी संपर्क साधावा )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular