Homeमुक्त- व्यासपीठराष्ट्रीय पालक दिवस…

राष्ट्रीय पालक दिवस…

पालक म्हटलं की आपल्या मनात एक आकृती निर्माण होते ती आकृती म्हणजे आपल्या आई वडिलांची असते.
आपल्याला जन्मल्यापासून ज्यांनी सांभाळले, ज्यांनी आपल्याला बोलायला शिकवले, शिक्षण दिले, मूलभूत गरजा भागवल्या असे आपले पालक- पालनहार जे काही आपल्या मुलांसाठी करतात त्याची भरपाई आणि उतराई कधीच होऊ शकत नाही. त्याची परतफेड करण्यासाठी आपल्याला पालक होऊनच करू शकतो. याच पालकांसाठी दरवर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या रविवारी पालक दिवस म्हणून साजरा केला जातो.

लहानपणापासून आपल्या मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे याची जाणीव करून देऊन मुलांमध्ये सामाजिक दृष्ट्या योग्य समज, आकलनक्षमता निर्माण करण्याचे कार्य पालक करीत असतात. पालक आपल्या मुलांसाठी कधीही काहीही करण्यासाठी तयार असतात. जे काही शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हव्या असलेल्या सुविधा देऊन जे काही मुलांना आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करतात.
सध्याच्या काळाचा विचार केला तर, मुलांचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून आपली ऐपत नसतानाही काही पालकांनी मुलांना स्मार्टफोन घेऊन दिले. का ? तर आपली मुलं शिक्षणापासून दुरावतील त्यांचं शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून.
आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून पालक मेहनत घेतात, अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. कधी कधी मुलांना मानसिक आणि भावनिक आधाराची गरज असते, यातूनच आपलं मूल वेगळ्या मार्गावर जाऊन काही विपरीत घडू नये म्हणून प्रत्येकवेळी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे पालक उभे राहतात. त्यांना आर्थिक आधार देऊन स्थिरस्थावर करतात. पालक हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यांना आपली जबाबदारी माहीत असते. कुटुंबातल्या सदस्यांची त्यांना नेहमीच काळजी असते. प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही करता येईल, जे शक्य आहे ते ते करण्याचा प्रयत्न पालक करीत असतात.
मुलांच्या गुणांची पारख करून त्यांच्यातल्या कलेला वाव देऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्या कलेत निपुण होण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.

पण जर कोणी पालक नसतील तर…
मुलांची मानसिकता कमकुवत होऊन, मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता जास्त असते. मुलं चुकीच्या मार्गाला जाण्याचा धोका वाढून मुलांना आपण काय करतोय आणि समाजात कसे वागावे हे न कळल्याने मुलांच्या हातून गैर वर्तणूक होण्याची शक्यताही वाढू लागते. पालकांचा मुलांवर धाक म्हणा किंवा त्यांना काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी कोणी नसेल तर त्यांच्या मनामध्ये समाजाबद्दल नकारात्मकता तयार होते.

मुलांनी आपण कितीही माठे झालो, कितीही पैसा कमावला आणि समाजात कितीही प्रसिध्द झालो तरीही आपल्याकडून छोटीशी चूक झाली तर ती पालकांना सांगणे गरजेचे आहे. तरच पालक मुलांना समजून घेऊ शकतात. आपल्या मुलांबद्दल त्यांच्या मनात असलेला विश्वास दृढ होत जातो. मुलांनी नेहमीच पालकांबरोबर अथवा पालकांनी मुलांशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणे गरजेचे आहे. यामुळे मुलांच्या मनात काय चालले आहे, मुलं एखाद्या विषयाकडे बघून काय विचार करतात याची कल्पना पालकांना निश्चितपणे येऊ शकते. परंतु हाच संवाद आज कुठेतरी हरवल्यासारखा दिसत आहे, आणि म्हणूनच काही मुलं वाम मार्गाला जाताना दिसतात.

आपल्या पालकांचा समाजात वावरण्याचा काळ जास्त असतो, त्यांचा अनुभवही जास्त असतो, त्यामुळे महत्त्वाचा निर्णय घेताना नेहमी पालकांचा सल्ला घ्यावा. आपले शिक्षण जरी त्यांच्यापेक्षा जास्त असले तरी आपल्याला जो निर्णय चुकीचा किंवा बरोबर असेल तर त्यावर आपल्या अनुभवानुसार पालक विचार करून त्याच निर्णयावर एखादा चांगला मार्ग सुचवू शकतात. बरीच अशी कुटुंब आहेत ज्यात अगदी वय जास्त असलेल्या माणसांना एकदातरी घरात घेतलेल्या निर्णयाबद्दल विचारले जाते. कारण त्यांना माहीत असते की, शिक्षण हे शिकवले जाते परंतु कैक वर्षांचा अनुभव हा निश्चितच योग्य मार्ग दाखवू शकतो. शिवाय आपल्या सल्ला विचारण्याने त्यांनाही समाधान मिळते हेही आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. आपल्याप्रती असलेला त्यांचा ऋणानुबंध जपला जातो.

पालकांना काहीही नको असते, आपल्या मुलांनी खुप शिकावे, खूप मोठे व्हावे इतकंच त्यांना हवं असतं.
म्हणूनच या सगळ्या गोष्टींसाठी आपण आपल्या पालकांचे योग्य ठिकाणी, योग्य वेळी आभार मानायला कधीच लाजू नका, विसरू नका. सदिव त्यांचा ऋणी राहा. उतारवयात त्यांचा आधार बना. वय थकले असेल तरी त्यांचा उत्साह कायम असतो. त्यांना कधीही एकाकी होऊ देऊ नका.

धन्यवाद…!!💐

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular