Homeमुक्त- व्यासपीठकोरोना - मी आणि माणुसकी

कोरोना – मी आणि माणुसकी

कोरोना …नाव जरी ऐकलं तरी घाबरायला व्हायचं.ज्यांना ज्यांना कोरोना झाला आणि जे जे या परिस्थीतीतुन गेले त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातील हा खूप मोठा अनुभव आहे.असाच अनुभव मला माझ्या आयुष्यात आला…
कोरोनाची पहिली लाट संपते न संपतेच कोल्हापुरात ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठा होता.कोल्हापुरात दुसरी लाट भयंकरच आली होती.ग्रामीण भागात प्रत्येक गावागावात कोरोना पॉझिटिव्ह पेशंट भेटत होते त्यामुळे गावागावाच्या येशी सुद्धा बंद केल्या होत्या.
मे महिन्याच्या अखेरीस भात पेरणीची लगबग आणि मध्येमध्येच पडणारा पाऊस यामुळे हवामान पार बिघडून गेले होते.माझ्या घरात एकूण आठ माणस..ऐंशी वर्षाची आजी बरोबर बायको, आई,बाबा,भाचा,मुलगी आणि चार वर्षाचा मुलगा.पेरणीची लगबग असतानाच अचानक वडिलांना शेतात ताप आला…टेस्ट केली वडिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला हे पाहून माझ्या हृदयाचा ठोकाचं चुकला…घरातील सर्वांची टेस्ट करावी लागणार असल्याने मी खूपच घाबरून गेलो…सर्वांना घेऊन टेस्ट करण्यासाठी गेलो. आजी निगेटिव्ह आली …बाकीचे मी आणी आई पॉझिटिव्ह आलो.सगळे घाबरलेल्या परिस्थितीत होते.पण मी घाबरलो तर घरचे सर्वजनच घाबरतील या हेतूने मीच सर्वांना धीर देत होतो…तेव्हड्यात वडिलांचा ब्लड प्रेशर कमी झाला हे कळालं त्यांना संत गजानन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल. मी आणी आई आजरा कोविड सेंटर मध्ये ऍडमिट झालो..माझी तब्बेत बिघडत जात होती ..रिपोर्ट काढले..दोन दिवसांनी रिपोर्ट आले…स्कोर होता 13…आता मात्र काहीही कळेनास झालं.हातात पैसा नसल्याने प्रायव्हेट मध्ये ऍडमिट होता येत नव्हतं…आई,वडील ऍडमिट…घरी पोर आजी काय करतायेत काही कळत नव्हतं.गडहिंग्लज मधील सरकारी दवाखाना शंभर खाट ला बेड शिल्लक आहे का बघितलं पण एकही बेड शिल्लक नव्हता.संपूर्ण हॉस्पिटल फुल्ल झाले होते…त्यांनी मला शेंद्री कोविड सेंटरला जायला सांगितले माझा मित्र दत्ताने व माझ्या बहिणीने मला घेतले आणि सरळ शेंद्री कोविड सेंटर ला आणले..ऍडमिट केले.. तेथे बेड मिळाला..नर्सने दोन गोळ्या दिल्या आणि निघून गेल्या.संद्याकाळी सहा नंतर अचानक ताप आला..अंग दुखायला लागले…एकीकडे घरच टेन्शन आणि त्यात मी ऍडमिट असल्याने काही सुचत नव्हतं..नर्सना बोलवलं ..ऑक्सीजन कमी असल्याने त्यांनी ऑक्सीजन लावल 9 गोळ्या देऊन निघून गेल्या.तस तर शेंद्री कोविड सेंटर मध्ये पेशन्टची काळजी,जेवण,नाश्ता,चहा,काढा वेळेवर होत होता.माझी बहीण घरातून रोज जेवण पाठवायची.सकाळी मामाचा मुलगा जेवण देऊन कामावर जायचा. दोन दिवस अगदी नॉर्मल असल्यासारखे झाले..तिसऱ्या दिवशी दुपारपासून पुन्हा मला उलट्या चालू झाल्या..श्वास घेताना जास्तच त्रास होऊ लागला…डॉक्टरानी ऑक्सीजन लेवल तपासली पण त्यात कोणताच फरक पडत नसल्याने शेवटी डॉक्टरांनी घरच्याना बोलावून घ्या म्हणून सांगितले…डॉक्टरांनी अस का सांगितलं असेल? या भितनेच मी पार घाबरून गेलो..बायको,आजी,मूल सोडली तर सगळेच ऍडमिट होते..तिकडे त्यांचे काय हाल होतायेत काही कळत नव्हतं…डॉक्टरांना तस मी सांगितलं.ऑक्सीजन लेवल खूपच कमी आहे आणि तुम्हाला जास्त ऑक्सीजनची गरज आहे म्हणून शंभर खाटला ऍडमिट व्हावं लागेल अस सांगितलं.आणि सोबत कोण असेल तरच पाठवणार असं सांगीतल्याने अगोदरच.कोरोना पेशन्टला सोबत घेऊन जायला रूपच खूपच घाबरत होती. .त्यामुळे त्याच्या घरी सुद्धा जाण्यास माणसे टाळाटाळ करत होती.कोणाला बोलवणार,कोण येणार,दुसऱ्या कोणाला बोलवणे पण खूप रिस्की असल्याने डॉक्टरांना मी माझ्या सोबत कोणी येणार नाही असं सांगितलं.
डॉक्टरांनी शंभर खाट हॉस्पिटल मध्ये फोन करून बेड शिल्लक आहे का चौकशी केली …हॉस्पिटल फुल्ल होते …एकही बेड शिल्लक नव्हता…त्यात ऑक्सीजन लेवल कमी असल्याने ऑक्सीजन ऍम्ब्युलन्सने जायचे होते . बेड नाही मिळाल्यास डॉक्टरांनी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जाण्यास सांगितलं होत.एकमोमाग एक-एक संकट येत होत. हातात माझा मोबाईल नव्हता… माझा मोबाईल घरी आणि घरातील साधा मोबाईल माझ्याकडे होता…त्यात माझ्या मित्रांचे कोणाचेच नंबर नव्हते…त्यात डोक्यातील अनेक प्रश्नांच्या गोधळामुळे कोणाचाच नंबर आठवत नव्हता…हळूहळू जगण्याची उम्मीद कमी होत होती…श्वास घ्यायला त्रास होत होता….ताईला सांगाव तर ताई घाबरून जाईल म्हणून मी मामाच्या मुलाला सर्व सांगितलं…तेवढ्यात संजय रेडेकर मित्राचा नंबर आठवला..फोन केला..उचलला नाही..पुन्हा केला…त्यांना संदीप चव्हाण ला फोन करून होनेवाडीच्या कृष्णा पाटील यांना फोन करून शंभर खाटला काहीही करून एक बेडची व्यवस्था करा आणि सर्व हकीकत त्यांना सांगा म्हणून सांगितलं बाहेर जोरदार पाऊस चालू होता आणि आत माझ्यावर संकटांचा पाऊस पडत होता.गेली अनेक वर्षांपासून समाजसेवा करणारी मुंबईतील शिवशाहू प्रतिष्ठांनचे सचिव कृष्णा पाटील त्यांच्यावर मी सर्व जबाबदारी टाकली होती.जे करतील ते पाटील साहेबच करतील म्हणून त्यांच्या फोनची वाट बगत होतो. तेवढ्यात संतोष चा फोन आला संत गजानन हॉस्पिटल मध्ये बेड शिल्लक होता पण 1.5 लाख भरावे लागणार होते. वडील अगोदरच त्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते त्यात माझ्या जाण्याने आजून खर्च वाढणार …आपल्याकडे इतका पैसा नसल्याने आणि इतका खर्च न झेपण्यासारखा असल्याने मी तिकडे जाण टाळलं आणि कृष्णा पाटील साहेबांच्या फोनची वाट बगत बसलो…बेड नाही वेळेत भेटला तर आपण पुन्हा घरी जाणार नाही याची मनाला हुरहूर लागत होती…तशी मनाची तयारी सुद्धा केली होती….डोक्यात अनेक विचारांचा गोंधळ असतांनाच रात्री 10:30 ला पाटील साहेबांचा फोन आला…बेड अरेंज केलाय आणि लवकरात लवकर शंभरखाटला जा.!…ऍम्ब्युलन्स आणि खरंच बेड शिल्लक आहे का ही खात्री केल्याशिवाय कोविड मध्ये वाले पाठवणार नव्हते.त्यांनी मला 108 ला फोन करायला सांगितलं..फोन केला आणि शेंद्री कोविड सेंटर मधून शंभरखाट जायचं म्हणून सांगितले…पण त्यांनीही फुल्ल आहे हॉस्पिटल म्हणून सांगितलं…कोणत्या डॉक्टरांशी बोलन झाल आहे का असं सांगितलं.आणि झाल असेल तर त्यांचा नंबर द्या तर आम्ही येतो…हे आजून एक नवीनच संकट आल्याने मनाची घालमेळ मनातल्या मनात चालूच होती…मला जास्त बोलताही येत नव्हतं…मी फोन ठेऊन दिला… पुन्हा त्यांनी फोन केला…मी ऍम्ब्युलन्स नको म्हणून सांगितलं…संतोष ला फोन केला त्याला सर्व सांगितलं…माझ्याकडे ऍम्ब्युलन्सचा नंबर आहे म्हणून संतोष ने सांगितलं…त्याने ऍम्ब्युलन्सला फोन करून त्यांना घेऊन रात्री आकरा वाजता आला…ऍम्ब्युलन्स मध्ये बसून रात्री साडेअकरा वाजता शंभरखाट हॉस्पिटलला पोचलो.हॉस्पिटल मध्ये पोचताच डॉक्टरांनी ऑक्सीजन आणि सलाईन लावली..मी तसाचं निपचित पडून राहिलो..मी जिवंत आहे की नाही काही माहित नव्हतं.सकाळी जाग आली आणि आपण जिवंत आहे याची खात्री पटली..हात जोडून देवाचे आभार आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानले.जी आपली होती ती लांब झाली पण जि तोंडाने माणुसकी जपली होती ती माणस आपली होऊन गेली.आजही लोक कोरोना खरंच आहे का ? असा प्रश्न करतात पण ज्यांना झाला आणि जे या कोरोनातून जिवंत राहिले त्यांनाच कोरोना होता की नव्हता याची जाण झाली..घरी आल्यानंतर सुद्धा माणस मला बगून लांबून जायची यासारखं दुर्देव मी कधीच अनुभवलं नव्हतं.कोरोना काळात कोरोनाने मात्र माणुसकी जपा असा संदेश द्यायला विसरला नाही…..

मी तानाजी धनकुटे(गजरगाव) ता.आजरा मला कोरोना काळात कश्याप्रकारे तोंड द्यावं लागलं आणि यातून माणुसकी कशी जोपासली याचा अनुभव थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे.
…माणस जपा…माणुसकी जपा..

  शब्दाकणं

शैलेश बाळासाहेब मगदूम
( निंगुडगे )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular