क्रिमरोल

भूक
उचंबळून वर यायची
आतडी फाटायची
जीभ सुकायची
लाईफ संघर्षाच्या काळात
करिअर करिअर म्हणायची
तेव्हा,
पोटाला आधार देणारा
कटिंग चहाबरोबर
खिसा सांभाळत हातात यायचास
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

दिवसातून एकच भेट
तुझं माहीत नाही
पण मी तरसायचो तुला भेटायला
भुकेचा आणि मेंदूचा
जुगार चाललेला असताना
भूक नेहमी हारायची
तेव्हा तू द्यायचास आधार
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

तू फार आवडत होतास
असं नाही
पण तू भूक अडवत होतास
काही काळ तरी
तुला बनवणाऱ्या हाताला
मी कायम सलाम करत राहिलो
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

मराठवाड्याचा दुष्काळ
विदर्भाचे दुःख
खान्देशी,माणदेशी,
कोकणी आणि बरंच काही
फक्त तू जवळून पाहिलं
तु प्रत्येकाचा आधार झालास
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

तू हातात आलास की
नेमकं त्याचवेळी आई
फोनवर विचारायची
काही खाल्लं का रे बाळा..?
तेव्हा तुला अख्खा तोंडात
कोंबून बोबडे बोल बोलायचो आईशी
आई जेवतोय नंतर बोलतो.
खरंतर तेव्हा फार जवळचा वाटायचास मला
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल…

अस्लमला भेटतोस
चंदनशिवेला भेटतोस
भोसलेला भेटतोस
आणि एखाद्या जोशीलासुद्धा
पण तूच एकमेव आहेस
कुणाला नाव,गाव,जात,धर्म
न विचारता आधार देत राहतोस
माझ्या प्रिय मित्रा क्रीमरोल..

तू संपून जाणारा
एक पदार्थ असलास तरीही
तू स्टगलरांचा फार मोठा आधार आहेस
तू मला जी साथ दिलीस
नाद खुळा यार नाद खुळा
पाच रुपयात भूक मारायची
कला तुझ्यात आहे
म्हणूनच
अनेक स्टगलर कलाकारांना
तुझा फार मोठा आधार आहे
माझ्या प्रिय मित्रा क्रिमरोल..

दंगलकार- नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ
जि.सांगली
7020909521
(कविता आवडल्यास आपल्या स्टगलर मित्रांना जरूर पाठवा यारहो..)

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular