Homeमाझा अधिकारज्ञानाने श्रीमंत पण पैशाने गरीब असलेल्या मुलामुलींची वकिली हे फार मोठे धाडस!

ज्ञानाने श्रीमंत पण पैशाने गरीब असलेल्या मुलामुलींची वकिली हे फार मोठे धाडस!

पैशाने मजबूत असलेले नामांकित सिनियर वकील ज्यूनियर वकिलांना पैसेच काय पण त्यांच्या वकिली क्लृप्त्या पण देणार नाहीत हे खरे आहे. कारण त्यांना वकिली व्यवसायात त्यांचे स्पर्धक तयार करायचे नाहीत, हे झाले एक कारण व ज्यूनियर वकील हे सिनियर वकिलांचे जवळचे नातेवाईक नाहीत हे झाले दुसरे कारण. ज्यूनियर वकिलांना हुशारीने वकिली व्यवसायाचे ज्ञान मिळवावे लागते व स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करावे लागते. यात बरीच वर्षे जातात. वकिलीतील प्रतिक्षा काळ हा इतर व्यवसायांपेक्षा खूप मोठा आहे. तोपर्यंत जीव गुदमरून जातो. याचाच शाप असेल कदाचित म्हणून न्यायाला विलंब लागून अशिलांचाही विशेष करून गरीब अशिलांचा जीव टांगणीला लागतो. गरिबीला म्हणूनच शाप म्हणता येईल. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील न्यायव्यवस्था ही अप्रगत किंवा प्रगती पथावर असलेल्या राष्ट्रांच्या न्यायव्यवस्थेपेक्षा गतीमान का आहे व प्रगत राष्ट्रांतील वकिली सगळ्यांच वकिलांसाठी खूप मानाची व भरपूर पैशाची का आहे हा अभ्यास व संशोधनाचा विषय आहे. आपल्या इथे भारतात गरीब घराण्यात जन्मून वकिलीत सन्मानाने टिकून रहायचे असेल तर मग शेती वगैरेतील घरचे कायम उत्पन्न किंवा कायम नोकरीवाला जोडीदार सोबत मदतीला हवा. यालाही काही वकील अपवाद आहेत ज्यांची हिंमत व हुशारी बघून मनात उत्साह निर्माण होतो. पण तरीही हे सत्य आहे की अप्रगत किंवा प्रगती पथावरील राष्ट्रांतील गरिबांच्या मुलामुलींनी सन्मानपूर्वक वकिली करणे हे फार मोठे आव्हान आहे. ते मी स्वतः खूप हिंमतीने व खूप कष्टाने पेलले आहे व माझे तेच अनुभव मी नवोदित वकिलांसाठी शेअर करीत असतो. मला माहित आहे की प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाही पण गरिबांच्या मुलामुलींसाठी वकिलीत झगडण्याची परिस्थिती सारखी आहे. वकिलीत पडण्यापूर्वी नीट विचार करा. फार चांगला पण तितकाच आव्हानात्मक व्यवसाय आहे हा! सगळी सोंगे आणता येतील पण पैशाचे सोंग आणता येत नाही हे लक्षात ठेवा. आपल्या वकिलीच्या इच्छेपोटी आपला संसार, आपली मुले यांची परिस्थिती दयनीय होऊ नये व समाजात आपली मानहानी होऊन पैशासाठी कोणाच्या हातापाया पडायला लागू नये म्हणून काळजी घ्या. आपली कौटुंबिक परिस्थिती, खूप प्रतिक्षा करण्याची आपली मानसिक सहनशक्ती, धैर्य, चिकाटी व यश फक्त पैशात मोजता येत नाही हे सत्य या सर्वांचा सारासार विचार करून व्यवस्थित प्लानिंग करून मगच गरिबांच्या मुलामुलींनी वकिली व्यवसायात उतरावे. कायद्याची पदवी घेतली की लगेच झाला वकील असे होत नाही. कायद्याची पदवी परीक्षा पास होणे व वकिलीत यशस्वी होणे सोडा पण वकिलीत नुसते टिकून राहणे हे सुद्धा फार मोठे आव्हान आहे विशेष करून गरिबांच्या मुलामुलींसाठी. काही लोक नोकरी करीत एलएल. बी. पदवी परीक्षा पास होतात पण नोकरी सोडून लगेच वकील होत नाहीत. नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर जवळ ग्रॅच्यूटी, प्रा. फंडाचा पैसा आला किंवा सरकारी पेन्शन सुरू झाले की मग उतार वयात वकिली सुरू करतात. पण अशी वकिली ही अंगावर काळा कोट चढविण्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी सुरू केलेली वकिली असते. सेवानिवृतांची अशी वकिली ही उतार वयातील वकिलीतील ज्यूनियरशिप असते. माझ्या वकिलीतील अनुभवातून सांगतो की वकिलीत मुरण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. म्हणून सांगतोय की ज्यांना खरोखरच वकील व्हायचे आहे त्यांनी तरूणपणापासूनच वकिली सुरू करावी व हळूहळू वकिलीत जम बसवावा. गरिबांच्या मुलामुलींनी मात्र आयुष्याचे, संसाराचे नियोजन नीट करून मगच तरूणपणापासून वकिलीत पडण्याचे धाडस करावे. हो, हे धाडसच आहे!

-ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular